जिल्ह्य़ाला सर्वागाने विकसनशील करायचे असेल तर जाहीर झालेल्या उद्योग धोरणात धुळे शहर व परिसराचा समावेश करण्याची गरज आहे. यामुळे बेरोजगारी कमी होऊ शकेल, असे मत प्रदेश युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. जवाहर पाटील यांनी व्यक्त केले आहे.
दंगलीच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच धुळे दौरा केला. या वेळी अ‍ॅड. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देवून जिल्ह्य़ाच्या विकासात आणि शांततेत बाधा ठरू शकणाऱ्या बाबींवर प्रकाश टाकला. दंगलीसारख्या अनिष्ठ घटना घडू द्यावयाच्या नसतील तर काही ठोस उपाय करणे गरजेचे असल्याचे अ‍ॅड. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. मुंबई-आग्रा महामार्गाचे चौपदरीकरण, तापी व पांझरा नदीवरील लघू प्रकल्प, नव्या उद्योगांसाठी देण्यात येणाऱ्या जमिनी, कुशल-अकुशल कामगारांची बहुसंख्येने उपलब्धता, असे सर्व काही धुळे जिल्ह्यात उपलब्ध आहे. यामुळे नवे प्रकल्प उभारण्यासह या भागात शासनाने आर्थिक उन्नतीसाठी ठोस पावले उचलणे अपेक्षित आहे. प्रकल्प उभारणीसाठी भरीव कर्ज उपलब्ध करून देणे, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या निधीत वाढ करणे, यंत्रमाग उद्योगांना नवसंजीवनी देणे आणि गतवैभव प्राप्त करून देणे यासह मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाची मागणीही त्यांनी केली आहे.