उत्तर नगर जिल्ह्यातील सहा आणि नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अवर्षणग्रस्त भागाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कामावर गेल्या ४५ वर्षांपासून ठाण मांडून बसलेली कंत्राटदार कंपनी व या कंत्राटदाराची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वाकचौरे यांनी म्हटले आहे, की सन १९६९ मध्ये निळवंडे धरणाला पहिली मंजुरी मिळाली. त्या वेळी ७ कोटी ९३ लाखांचा खर्च त्यासाठी अपेक्षित होता. मात्र मागच्या ४५ वर्षांत धरणाचा खर्च सुमारे २ हजार ४०० कोटींवर पोहोचला आहे. चार मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेल्या या धरणाच्या िभतीचे काम आता ९५ टक्के पूर्ण झाले आहे. अर्धशतकी कालावधी लागणारे हे देशातील एकमेव धरण आहे. निवडणुका आल्या की धरणाची टिमकी वाजविणाऱ्या या भूमीतील अनेक नेत्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात या प्रश्नाने केली आणि शेवटीही आता त्यांच्या दुसऱ्या पिढय़ा राजकारणात स्थिरस्थावर होऊन तिसऱ्या पिढय़ांच्या राजकीय रोपणाची स्वप्ने पाहण्याचे काम जोरात सुरू आहे.
सिंचनाचे प्रश्न ‘जैसे थे’ ठेवून या नेत्यांनी येथील शेतकऱ्यांचा गळा घोटला आहे. निळवंडे धरणाचे काम करणारी न्यू एशियन कंपनी गेल्या ४५ वर्षांपासून कार्यरत आहे. या ठेकेदाराच्या शब्दावर मुख्य अभियंत्यासह कार्यकारी अभियंत्याचीही उचलबांगडी झाल्याच्या घटना ताज्या आहेत. या प्रकल्पास अर्थसंकल्पात मंजूर झालेला पैसा कामावर कमी आणि भ्रष्टाचारावरच अधिक खर्च झाला असल्याचे अनेक वेळा उघड झाले आहे. या प्रकल्पासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री कालबाहय़ झाली आहे. हा प्रकल्प जलसंपदा विभागकडून लघुपाटबंधारे विभागाकडे अचानक वर्ग केला असून, याच्या मुळाशी भ्रष्टाचारास अनुकूल असलेले अधिकारी आहेत. राजकीय नेते व अधिकाऱ्यांच्या संगनमताने या ठेकेदाराने या प्रकल्पाच्या कामात मोठा भ्रष्टाचार केल्याचा स्पष्ट आरोप करून या ठेकेदाराची गुप्तचर खात्यामार्फत चौकशी करावी अशी मागणी वाकचौरे यांनी केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा