जळगाव महापालिका निवडणूक
आजी-माजी नगरसेवकांसह असंख्य इच्छुकांनी महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी तयारी सुरू केली असताना घरकुल घोटाळ्यातील संशयित किंवा गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या व्यक्तींना कोणीही उमेदवारी देऊ नये, असे आवाहन शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी केले आहे.
तत्कालीन नगरपालिका व महापालिकेतील विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या कार्यकाळात घरकुलसह इतरही घोटाळे झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेचे आर्थिक कंबरडेच मोडले आहे. महापालिकेवर सध्या सुमारे ५०० कोटींचे कर्ज असून कर्जाचे हप्ते व व्याज भरण्याची महापालिकेची क्षमता नाही. महापालिकेच्या १७ मजली इमारतीसह इतर व्यापारी संकुलांवर जप्ती येऊन त्यांचा लिलाव करण्यापर्यंतची वेळ आली आहे. या दिवाळखोरीमुळे शहरातील विकासकामे ठप्प झाली असून कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर होऊ शकत नाहीत. हे दुर्दैव असल्याचे मत ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे. महापालिकेचा घरकुल घोटाळाच केवळ सध्या चर्चेत असून वाघूर पाणीपुरवठा योजना, शहरातील रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी अटलांटा कंपनीची योजना, विमानतळ विकास, जिल्हा क्रीडा संकुल या योजनांसह जिल्हा बँकेतील घोटाळे चर्चेत येणे बाकी आहे. घरकुल योजना घोटाळ्यात सत्ताधारी गटाचे नेते आ. सुरेश जैन, तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव देवकर यांसह बऱ्याच आजी-माजी नगरसेवक व नगराध्यक्षांना तसेच माजी महापौरांना अटक झाली असून जैन, माजी महापौर प्रदीप रायसोनी हे अद्यापही तुरुंगातच आहेत.देवकरांसह काही माजी महापौर, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक जामिनावर सुटले असले, तरी घरकुल घोटाळ्यातील ते संशयित आहेत. त्यांना या प्रकरणात शिक्षाही होऊ शकते. घरकुल प्रकरणातून सुटले तरी वाघूर पाणीपुरवठा योजना व विमानतळ विकास आणि अटलांटाप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्य़ातही अनेकांना अटक होऊ शकणार आहे. घरकुलात अडकलेली मंडळीच निवडणूक लढण्यासाठी सर्वात पुढे असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक बंडू काळे पद आणि पक्षाचा राजीनामा देऊन नुकतेच भाजपमध्ये दाखल झाले आहेत. काळे यांच्यासह त्यांची पत्नी सुधा काळे व पुतण्या मनोज हेही भाजपकडे उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येते. भाजपसह सत्ताधारी खान्देश विकास आघाडी, शहर विकास आघाडी, राष्ट्रवादी व मनसेही यावेळी निवडणूक रिंगणात उतरत आहेत.
राष्ट्रवादीच्या नगरसेविका मीनाक्षी सरोदे यांचे पती माजी नगरसेवक लीलाधर सरोदे हे नुकतेच मनसेत दाखल झाले आहेत. पालिका गैरव्यवहार ठरावात त्यांचेही नाव घेतले जाते. त्यामुळे घरकुल घोटाळ्यासह इतर गुन्ह्य़ांत सहभागी तसेच तुरुंगात जाऊन आलेल्या कोणालाही उमेदवारी देऊ नये, अशी मागणी विजय पाटील, अ‍ॅड. दत्तात्रय देशमुख, आरिफ शेख, नितीन साळुंखे यांनी केली आहे.

Story img Loader