दोन वर्षांने शहरात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर भुसावळ विभागातील सर्वाधिक महसूल देणाऱ्या नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण, स्वयंचलित जिना, रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी जागा ताब्यात घेणे, ओढा टर्मिनस इत्यादीसह विविध प्रलंबित विषय मार्गी लावावेत, अशी मागणी खा. समीर भुजबळ यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.
रेल्वे विभागीय तपासणी कार्यक्रम प्रसंगी नाशिकरोड स्थानकावर भुजबळ यांचे निवेदन महाव्यवस्थापक जैन यांनी स्वीकारलेय याबाबत सकारात्मक विचार करण्याची ग्वाही त्यांनी दिली. महापालिकेने नाशिकरोड स्थानकाच्या विकासासाठी ४१ हजार ३६ स्क्वेअर मीटर जागा आरक्षित केली असून त्यापोटी सुमारे १६ कोटी ८२ लाखाचा मोबदला महापालिकेने मागितला आहे. हा विषय रेल्वे मंडळाकडून तत्काळ मंजूर करून घेण्याची सूचनाही भुजबळ यांनी केली आहे. नाशिकरोड स्थानकावर स्वयंचलित जिना अथवा लिफ्ट लावल्यास अपंग व महिला प्रवाशांची सोय होणार आहे. नाशिकरोड स्थानकच्या आधुनिकीकरणाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित आहे. देवमंदिर पुलावरून फलाट क्रमांक एकवर उतरण्यासाठी सुविधा द्यावी, फलाट क्रमांक दोन आणि तीनवर प्रतिक्षालय असावे, कॅनडा कॉर्नर आरक्षण केंद्रात पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, रेल्वे पोलीस असावेत, तपोवन एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेसमधील प्रवाशांची गर्दी लक्षात घेता त्याला अतिरिक्त डबे लावण्यात यावेत, भुसावळ-पुणे गाडीला नांदगाव आणि शिवाजीनगर येथे थांबा द्यावा, ईगतपुरी-धुळे शटल सुरू करावी, दुचाकी व चारचाकी गाडय़ा पार्क करण्यासाठी प्रवाशांना नियमानुसार शुल्क आकारले जावे, ओढा स्थानकाजवळ राज्य सरकारचे टर्मिनल मार्केट प्रस्तावित आहे. या ठिकाणाहून तपोवन-पंचवटी हा भाग जवळ असल्यामुळे या ठिकाणी कुंभमेळ्यातील गर्दी विभागली जाऊ शकते. या हेतूने ओढा येथे पॅसेंजर कार्गो टर्मिनलची उभारणी करावी, अशा मागण्या जैन यांच्याकडे भुजबळ यांनी केल्या आहेत.

Story img Loader