एसटी महामंडळाच्या गाडय़ा रस्त्यांवरच्या धाब्यांवर रात्रीबेरात्री थांबवून त्या धाब्यांचे अनधिकृत थांबे करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. नगरच्या एका प्रवाशाने या विरोधात मोहिमच सुरू केली असून महामंडळाने दखल घेतली नाही तर न्यायालयात जाण्याची तयारी सुरू केली आहे.
रस्त्यांवरच्या धाब्यांवर गाडय़ा या प्रकारे थांबवून एसटीचे चालक प्रवाशांची विशेषत: महिला प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आणत आहेत, दिल्लीसारखा एखादा भयंकर प्रकार झाल्यानंतरच महामंडळ जागे होणार आहे का असा प्रश्न दत्ता खोजे या छायाचित्रकार प्रवाशाने महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे तसेच व्यवस्थापकीय संचालक दिपक कपूर यांनी पत्र पाठवून केला आहे. सोबत त्यांनी या धाब्यांवर थांबलेल्या एसटी गाडय़ांची स्वत: काढलेली छायाचित्रेही दिली आहेत.
नगर-पुणे मार्गावर सुप्याजवळ असणाऱ्या एका हॉटेलपासून सुरू झालेल्या या प्रकाराची वैयक्तीक झळ बसल्यानंतर खोजे यांनी त्याचा पाठपुरावा सुरू केला व त्यांना यातील धोके लक्षात आले. काही धाब्यांवर तर चालक मद्यपान करतात असेही त्यांना आढळले. किमान अर्धा तास व नंतर चालकवाहकांचे आवरून होत नाही तोपर्यंत असा बराच काळ धाब्यांवर गाडी थांबलेली असते. या काळात गाडीला कसलीही सुरक्षा नसते. धाब्यांच्या आसपासच्या गावातील टगे जमा होऊन मौजमस्ती करत असतात. भुरटे, चोरटे गाडीच्या आसपास फिरत असतात. काही गुंड गाडय़ांवर नजर ठेऊनच बसलेले असतात. सुप्याजवळच्या त्या एसटी गाडय़ांच्या थांबण्यामुळेच प्रसिद्ध झालेल्या हॉटेलजवळ एका गाडीतील बॅग अशीच चोरीला गेली.
एसटीच्या गाडय़ा स्थानकातच थांबवणे चालकवाहकांवर बंधनकारक आहे. मात्र हे बंधन त्यांनी कधीचेच उडवून लावले आहे. धाब्यावर गाडी थांबवता यावी यासाठी ते अधिकृत स्थानकात गाडी नेतच नाहीत किंवा नेली तर फक्त एन्ट्री करण्यापुरती थांबवतात व लगेचच काढतात. शिरूर येथील प्रवासी संघटनेने तर या विरोधात वारंवार आंदोलन केले आहे. धाब्यांवर या चालकवाहकांची धाबेचालकाने सर्व प्रकारची व्यवस्था केलेली असती. चहा, नाष्टा, जेवण फुकट व प्रत्येकी ५० रूपये अशी ही व्यवस्था आहे. बसण्यासाठी स्वतंत्र जागा, वर सिगारेट, तंबाखू हेही फूकट त्यामुळेच चालकवाहक गाडय़ा धाब्यांवर थांबवण्यास पसंती देत असतात.या विरोधात लेखी तक्रार केल्यानंतर आलेला अनुभवही खोजे यांनी महामंडळाचे अध्यक्ष व संचालक यांना पाठवलेल्या पत्रात दिला आहे. तक्रार पुस्तकाच्या पानांवर क्रमांक नसतात, त्यामुळे तक्रार असलेले पानच फाडून टाकले जाते. त्याचाही पुरावा त्यांनी दिला आहे. एसटीच्या गाडय़ांचे राज्याच्या सर्व मार्गावरील धाब्यांवर तयार झालेले अनधिकृत थांबे त्वरीत बंद करावेत, संबधित चालकवाहकांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पत्रात केली आहे. त्याची दखल घेतली नाही तर याविरोधात आपण सर्व पुराव्यासहित न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहोत असे त्यांनी सांगितले.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा