इचलकरंजी शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याच्या निविदेवेळी बोगस अर्ज भरणाऱ्यांची पोलिसांमार्फत चौकशी करुन दोषींवर फौजदारी दाखल करावी, अशी मागणी आरोग्य समितीचे सभापती जहाँगीर पटेकरी यांनी प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी देवेंद्र सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान, या प्रकरणी उपमुख्याधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे व डेपोवर नेऊन टाकणे, रस्ते व गटारींची साफसफाई करणे या कामी २ कोटी ५५ लाख रुपयांची निविदा काढण्यात आली होती. पण ही निविदा वादग्रस्त आणि बहुचर्चित बनली आहे. पहिल्यांदा विरोधी शहर विकास आघाडीने केलेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी ही निविदा रद्द ठरविली. तर दुसऱ्यांदा काढण्यात आलेल्या निविदावेळी प्राप्त दोन लिफाफ्यात दोन लिफाफे बोगस निघाल्याने परत रद्द करून फेरनिविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
आरोग्य सभापती पटेकरी यांनी दिलेल्या निवेदनात, संदर्भीय कामासंदर्भात निविदा मागविण्यात आल्या होत्या. या वेळी एकूण ४ निविदा प्राप्त झाल्या हात्या. त्यामध्ये दोन लिफाफे हे बोगस व निनावी टाकून एकप्रकारे नगरपालिकेची चेष्टाच केली आहे. आरोग्याशी निगडित कामे होऊ नयेत यासाठीच जाणूनबुजून हेतुपुरस्सर कृत्य करून नगरपालिकेस वेठीस धरले आहे. असे कृत्य करणाऱ्यांची पोलिसांमार्फत चौकशी करून संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना पटेकरी यांच्यासोबत नगरसेवक भाऊसाहेब आवळे, माधुरी चव्हाण आदी उपस्थित होते.

Story img Loader