महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सोलापूर जिल्हा आगारात डिझेल घोटाळा झाला असून त्याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी, मनसेचे जिल्हा संघटक दिलीप चौगुले यांनी केली आहे.
परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांना धोत्रे यांनी पाठविलेल्या निवेदनात संबंधितांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्य़ातील एसटी आगारात डिझेल घोटाळा उघडकीस आला असून याप्रकरणी चार आगार व्यवस्थापकांना निलंबित केले आहे, तर एका व्यवस्थापकाची बदली केली आहे. त्यांच्यावर फौजदारी खटले दाखल व्हावेत, अशी मागणी मनसेने केली आहे.
सोलापूर आगाराचे व्यवस्थापक विवेक हिप्पळगाकर यांच्यासह अक्कलकोटचे आगार व्यवस्थापक एन. टी. गायकवाड, बार्शीचे आगार व्यवस्थापक प्रशांत वासकर, अकलूजचे आगार व्यवस्थापक एन. एच. मिले यांना निलंबित करण्यात आले आहे. तर पंढरपूर आगाराचे व्यवस्थापक एच. एस. साळुंखे यांची सातारा येथे बदली करण्यात आली आहे. तर यांत्रिक अभियंता आय. एम. वन्नालोलू यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे.

Story img Loader