केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व काँग्रेस प्रवक्ते दिग्विजय सिंग यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ इचलकरंजीतील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. आंदोलन करणाऱ्या सुमारे ५० कार्यकर्त्यांना गावभाग पोलिसांनी अटक करून नंतर त्यांची सुटका केली. सुशीलकुमार शिंदे व दिग्विजय सिंग यांनी देशातील दहशतवादामध्ये हिंदुत्वादी संघटनांचा सहभाग असल्याचे विधान केले होते. त्यावरून संघपरिवार व भाजपामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. याअंतर्गत आज शिंदे व सिंग यांच्याविरुद्ध देशव्यापी निदर्शनाचा कार्यक्रम भाजपाच्या वतीने आयोजि केला होता. या अंतर्गत इचलकरंजीतील भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कॉ.के.एल.मलाबादे चौकात जोरदार निदर्शने केली.
शिंदे व सिंग यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात गोपाल जासू, धोंडिराम जावळे, गणेश बद्धी, विश्वनाथ कबाडी, जगन्नाथ नगरी, हणमंत वाळवेकर, सुरेश माने, दीपक पाटील, उद्धव हावळ, ऋषभ जैना, नागूबाई लोंढे, अंजली आगलावे यांनी नेतृत्व केले. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना गावभाग पोलिसांनी आंदोलनस्थळी अटक करून पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आले. सायंकाळी त्यांची सुटका करण्यात आली.