अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात निर्घृण हत्या होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध पोलीस तपास यंत्रणेला अद्यापि लागत नसल्याच्या निषेधार्थ शनिवारी सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माकपच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो स्त्री-पुरूष कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
या वेळी बोलताना आडम मास्तर यांनी राज्य व केंद्र सरकारच्या अंधश्रध्देला खतपाणी घालणाऱ्या धोरणावर चौफेर हल्ला चढविला. एकीकडे अंधश्रध्देचे निर्मूलन होण्यासाठी डॉ. दाभोलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आयुष्यभर चळवळ उभी करून विज्ञानवाद व विवेकवाद समाजात वाढीस अविरत प्रयत्न चालविले असताना विशेषत अंधश्रध्दा निर्मूलन कायदा संमत होण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा चालविला असताना त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले. हितसंबंध दुखावलेल्या धमार्ंध व सनातनी प्रवृत्तींनी डॉ. दाभोलकर यांचा खून केला. या खून प्रकरणाचा तपास दोन महिने होऊन गेले तरी लागत नसताना दुसरीकडे उत्तर प्रदेशात कोणा साधूला स्वप्न पडले म्हणून केंद्र सरकारने उत्खननाचे काम हाती घेतले आहे. ही सरकारची भेंदूगिरी नव्हे तर काय, असा सवाल आडम मास्तर यांनी उपस्थित केला. डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास यंत्रणेने व्यापक आणि प्रामाणिक प्रयत्न करावेत, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून सरकारच्या विरोधात निदर्शने केली. नगरसेवक माशप्पा विटे, महादेवी अलकुंठे, सुनंदा बल्ला, माजी नगरसेविका नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, एम. एच. शेख, व्यंकटेश कोंगारी, सिध्दप्पा कलशेट्टी आदींनी या आंदोलनात प्रामुख्याने सहभाग घेतला होता. आंदोलकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

Story img Loader