शहरातील विविध भागात डेंग्यूचे संशयित रुग्ण मोठय़ा संख्येने आढळून येत असल्याचे वृत्त झळकताच महापालिका खडबडून जागी झाली आहे. महापालिकेने आता डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गेल्या आठ महिन्यांत शहरात डेंग्यूने एकाचाही मृत्यू झाला नसल्याचा दावाही महापालिकेने केला आहे.
डेंग्यू आजारापासून संरक्षण करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यामुळे या आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांच्या मनातील भीती दूर करावी, असे निर्देश महापालिकेचे आयुक्त श्याम वर्धने यांनी दिले. या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. श्याम वर्धने यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अप्पर आयुक्त हेमंत पवार, उपायुक्त संजय काकडे, महापालिकेचे आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, आरोग्य अधिकारी (एम) डॉ. सविता मेश्राम, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहायक संचालक (हिवताप) डॉ. एम.बी. गणवीर, मेडिकलचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. एम.आर. सिंग, डॉ. ए.एम. सोमलवार, पीएसएम प्रमुख डॉ. अरुण हुमणे, मेडिसिन विभागप्रमुख डॉ. वंृदा सहस्त्रभोजने, आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे, सचिव डॉ. कुश झुनझुनवाला, डागा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आर.एस. फारुकी, महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. स्वाती मटकरी, सदर रोगनिदान केंद्राच्या डॉ. शिल्पा जिचकार, महाल येथील रोगनिदान केंद्राचे डॉ. नरेंद्र बहिरवार प्रामुख्याने उपस्थित होते.
खासगी प्रयोगशाळेच्या संचालकांनी तसेच रुग्णालयांनी त्यांच्या रुग्णालयात दाखल असलेल्या डेंग्यू रुग्णांची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला पाठवावी. खासगी होर्डिंग्सवर कीटकजन्य आजाराची माहिती लावावी, स्वयंसेवकांनी प्रत्येक घरी जाऊन अळ्यांची ओळख करून घ्यावी. घरातील पाणीसाठे एक दिवस स्वच्छ धुवून-पुसून वापरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. शिक्षणाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या सर्व शाळेत डेंग्यू संदर्भात माहिती द्यावी, असे निर्देश वर्धने यांनी दिले.
या बैठकीत सहायक संचालक डॉ. एम.बी. गणवीर यांनी नागपूर शहरात भंडारा पॅटर्न राबवण्याची सूचना केली. शहरातील सर्व खासगी डॉक्टरांना एक पत्र पाठवून संपूर्ण माहिती महापालिकेला देण्यास सांगावी, अशी सूचना संजय देशपांडे यांनी केली. यावेळी डॉ. हुमणे, डॉ. सहस्त्रभोजने यांनीही काही सूचना केल्या. गेल्या आठ महिन्यात शहरातील हिवताप आलेल्या ३५१ नागरिकांचे नमुने घेण्यात आले असून त्यात ६० जण पॉझिटिव्ह आढळून आले. डेंग्यूमुळे कुणाचाच मृत्यू झाला नाही. जेथे डासाच्या अळ्या आढळून येत आहे, त्या नष्ट करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांची संख्या फारच कमी असल्याने शहरातील सर्वच भागात निरीक्षण करणे अशक्य होत असल्याची माहिती महापालिकेच्या हिवताप अधिकारी जयश्री थोटे यांनी देऊन कोणत्या उपाययोजना करण्यात येत आहे, याची माहितीही त्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा