पूर्व विदर्भात गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच पाऊस झाल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसून येत आहे. परिणामी, डासांची उत्पत्ती झाली आहे. यामुळे संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. पूर्व विदर्भाच्या सहा जिल्ह्य़ात खासगी आणि शासकीय रुग्णालयात ३०० वर डेंग्यूच्या आजाराने ग्रासलेले रुग्ण आढळून आले. या रुग्णांपैकी २६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तसेच १६ रुग्णांचा मलेरियाने मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.
यावर्षी जून महिन्यापासून विदर्भात बऱ्याच वेळा अतिवृष्टी झाली आहे. या काळात चिखलामुळे सर्वच भागात घाण पसरली असून डासांची संख्या वाढली असल्याचे चित्र आहे. शासनाच्या आरोग्यसेवा विभागात अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे साथीच्या आजारांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शासनाला कठीण होत आहे. अल्झायमेथरिन, डेल्टामेथरिनची फवारणी काही भागात सुरू आहे, पण ती फारच कमी प्रमाणात आहे. विविध समस्यांमुळे सरकारी रुग्णालयात रुग्णांवर योग्य उपचार होत नाही. त्यामुळे खेडेगावातील नागरिक उपचारासाठी खासगी रुग्णालयाकडे जात आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना तेथील असुविधांमुळे नागपूरला मेडिकल, मेयोमध्ये पाठविले जात आहे. यामुळे बराच कालावधी लागत असून त्याच फटका रुग्णांना बसत आहे. सध्या दिवसा उष्मा आणि रात्री पाऊस, असे वातावरण पूर्व विदर्भात दिसून येत आहे. या कारणांमुळे साथीचे आजार बळावले आहेत. गेल्या ९ महिन्यात १२ जणांचा डेंग्यूच्या आजाराने, तर ९ जणांचा मलेरियाने मृत्यू झाल्याची माहिती आहे. वर्धा येथे ७, गडचिरोली ६, भंडारा ४, नागपूर (ग्रा)४, चंद्रपूर २, गोंदिया २ आणि नागपूर शहर १, अशा एकूण २६ जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे.