अहो, तुमच्या रुग्णाच्या रक्तामधील पेशी कमी झाल्या आहेत. तुम्हाला डेंग्यूसदृश आजार झाला आहे. त्यामुळे तातडीने त्याची उपचार पद्धती बदलण्याची गरज आहे, अशी डेंग्यूची भीती दाखवून सध्या पनवेलच्या वैद्यकीय क्षेत्रातून सामान्यांची राजरोस लूट सुरू आहे. पनवेल परिसरात डेंग्यूसदृश आजाराचे अचानक सुमारे २०० रुग्ण वाढले आहेत. स्वच्छ पाणी अनेक दिवसांपासून घरात साठवून ठेवल्यास त्या पाण्यावर डेंग्यूच्या अळ्या जन्माला येतात. याबाबत सिडको, जिल्हा परिषदेचे व नगर परिषदेचे आरोग्य विभाग जनजागृती करून नागरिकांना सावध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जागृती कितीही झाली तरीही पनवेलमध्ये डेंग्यूचा बोलबाला कायम आहे. सरकारी आकडेवारीनुसार ऑक्टोबर महिन्यात तालुक्यात ३ डेंग्यूचे रुग्ण होते. सात लाख लोकवस्तीच्या पनवेलमध्ये प्रत्येक डॉक्टरांचे दवाखाने व रुग्णालयांमध्ये १० रुग्णांमध्ये एकास डेंग्यूची लागण झाल्याचे चित्र पाहायला मिळते. पनवेलमध्ये २०० हून अधिक डॉक्टर आपली वैद्यकीय सेवा पुरवितात. सिडको वसाहतीमधील दवाखाने व रुग्णालये चालविणाऱ्या डॉक्टरांना सिडकोच्या आरोग्य विभागाने डेंग्यूच्या आजाराचा रुग्ण आढळल्यास त्याची माहिती सिडकोला कळवावी अशी लेखी नोटीस दिली आहे. या नोटिसीला डॉक्टरांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे सिडकोच्या वतीने सांगण्यात येते. मात्र हेच डॉक्टर रुग्णांच्या नातेवाइकांना रक्ताच्या अहवालाच्या पेशींच्या संख्या कमी झाल्याने डेंग्यू असण्याची शक्यता असल्याचे ठामपणे सांगताना दिसतात. रुग्णाला डेंग्यू झाल्याचे समजताच भीतीच्या सावटाखाली आलेल्या नातेवाइकांची तारंबळ उडते. पनवेलमध्ये बोटावर मोजण्याइतकी रक्त तपासणी केंद्र ही एमडी डॉक्टर चालवितात. इतर रक्त तपासणी केंद्र डीईएमएलटी शिक्षण घेतलेल्या व्यक्ती जवळच्या डॉक्टरांच्या आशीर्वादाने चालवितात. डॉक्टरांनी रुग्णाच्या रक्त तपासणी केंद्रांतूनच रक्त तपासण्यासाठी केलेली सक्ती हे एक कारण ही परिस्थिती निर्माण करण्याला कारणीभूत असण्याची भीती सरकारी आरोग्य विभागाकडून व्यक्त होत आहे. डॉक्टरांनी सरकारी आरोग्य विभागाच्या आदेशाला दिलेल्या फाटय़ामुळे नेमके तालुक्यात डेंग्यूचे किती रुग्ण आहेत याविषयी कोणत्याही सरकारी विभागाकडे अधिकृत आकडेवारी नाही. पनवेल परिसराचा काही भाग जिल्हा परिषद, सिडको व नगर परिषद अशा विविध प्रशासनाच्या अंतर्गत येतो, त्यामुळे पनवेलच्या आरोग्यावर नियंत्रण कोणाचे असा प्रश्न उद्भवला आहे. सिडको वसाहतींमध्ये आतापर्यंत डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाल्याची माहिती सिडकोचे आरोग्य विभागाचे प्रमुख डॉक्टर बी. एस. बावस्कर यांनी दिली. ऑक्टोबर महिन्यात सिडको वसाहतींमध्ये ३० डेंग्यूचे संशयित रुग्ण असल्याची माहिती सिडकोच्या आरोग्य विभागाकडे प्राप्त झाली आहे. डॉक्टरांनी नातेवाइकांना भीती दाखवण्यापेक्षा मुळात त्या रुग्णाला डेंग्यूची लागण आहे का याची खात्री करण्याची गरज आहे. डॉक्टरी सेवेला धंदा बनविणाऱ्यांचा शिरकाव झाल्याने प्रामाणिक डॉक्टरांची उणीव भासत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. रहिवाशांनी स्वच्छ पाणी दोन दिवसांवर साठवून ठेवू नये. फुलदाण्या, कुंडीखालील प्लेट, साचलेले पाणी अशी ठिकाणे डेंग्यूच्या अळ्यांसाठी पोषक असल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा