विदर्भात डेंग्यू आणि मलेरियाबाबत जनजागृती मोहीम राबविली जात असली तरी लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. विदर्भात गेल्या सहा महिन्यांत ७६५ रुग्णांना डेंग्यूच्या आजाराची  लागण झाली असून त्यातील २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर जिल्ह्य़ातील काही गावांमध्ये डेंग्यूने पाय रोवले असून २२ रुग्णांना या आजाराची लागण झाली आहे. आरोग्य विभागातर्फे करण्यात येणाऱ्या जनजागृतीवर यामुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
ठिकठिकाणी पाणी साठवणुकीमुळे आणि कचऱ्यामुळे विदर्भात डासांची संख्या वाढत आहे. जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार विदर्भात गेल्या सहा महिन्यात तीन हजार १०१ लोकांचे रक्ताचे नमूने घेण्यात आले आहे. त्यातील ७६५ लोकांना डेंग्यूची लागण झाली आहे. आतापर्यत २५ लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद असली तरी ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात सर्वात जास्त चंद्रपूर जिल्ह्य़ात १ हजार ११६ लोकांचे नमूने घेतले आहे. त्यापैकी २२३ लोकांना डेंग्यूची लागण झाली आहे. वर्धा जिल्ह्य़ात डेंग्यूमुळे ७, गडचिरोलीमध्ये ६, नागपूर ग्रामीणमध्ये ५, भंडारामध्ये ४, चंद्रपूरमध्ये २, नागपूरमध्ये एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
शहरात जानेवारी ते ऑक्टोबपर्यंत डेंग्यूचे १९१ रुग्ण आढळले. महापालिकेच्या आरोग्य विभागाने यापैकी १४ रुग्णांची नोंद केली. इंदोरा येथील प्रयोगशाळा तंत्रज्ञ  डॉ. रेहान राजा यांनी डेंग्यूच्या रुग्णात वाढ झाली, असे सांगितले. गेल्या सात दिवसात महापालिकेने ३८ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याची नोंद केली आहे. नागपुरात लक्ष्मीनगर भागात ५२ रुग्ण, धरमपेठेत २२, हनुमाननगरात ७८, धंतोली २४ , नेहरूनगर ३१, गांधीबाग ४९, सतरंजीपुरा ३४, लकडगंज ४७, आशीनगर ४३, मंगळवारी ५६ अशी आकडेवारी ऑक्टोबपर्यंतची आहे.
डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्यास खासगी रुग्णालये आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञांनी महापालिकेला महिती देणे आवश्यक आहे, पण माहिती दिली जात नाही. त्यामुळे महापालिकेला उपाययोजना करता येत नाहीत. याबाबत माहिती न दिल्यास खासगी रुग्णालये व प्रयोगशाळा तंत्रज्ञांचे परवाने रद्द केले जातील, असे महापालिकेचे आरोग्य अधिकारी अशोक उरकुडे यांनी सांगितले. पाणी साठवून ठेवल्यामुळे डेंग्यूचे डास आणि रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे डॉ. अशोक उरकुडे यांनी स्पष्ट केले.  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद गणवीर यांनी सांगितले, डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असले तरी त्यांच्यावर उपचार केले जात आहे. आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जात असून नागरिकांनी स्वच्छतेबाबत काळजी घेणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागात हिंगणा व नरखेडसह अन्य तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामपंचायतने स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गोतमारे यांनी दिली. ग्रामीण भागातील जिल्हा रुग्णालयात अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. गावातील साचलेल्या नाल्यांना वाहते करणे, घरगुती टाके, माठ, भांडे दररोज स्वच्छ केले पाहिजे, असेही गोतमारे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा