नवी मुंबई महापालिकेच्या अक्षम्य अशा दुर्लक्षामुळे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील सर्व उपनगरांमध्ये डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांची साथ पसरली असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार गेल्या महिनाभरात शहरात मलेरियासदृश तापाने सुमारे २७५ रुग्ण आजारी असून डेंग्यूने आजारी असलेले ५० हून अधिक संशयित रुग्ण सापडले आहेत. शहरातील खासगी दवाखाने, रुग्णालयांमध्ये भरती असलेल्या रुग्णांचा प्रत्यक्ष आकडा त्याहून बराच मोठा असल्याची भीती व्यक्त होत असून महापालिका रुग्णालयातील रुग्णांच्या अक्षरश: रांगा दिसू लागल्या आहेत.
नवी मुंबईतील साफसफाई यंत्रणेचे गेल्या काही महिन्यांपासून अक्षरश: तीनतेरा वाजले आहेत. घनकचरा विभागाचा साफसफाई ठेकेदार नेमण्याचा प्रस्ताव वेगवेगळ्या वादात सापडल्यामुळे शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. यामुळे साथींचे आजार पसरण्याचा धोका वाढला असून पावसाळ्यात मलेरिया आणि डेंग्यूसदृश तापाने आजारी असलेल्या रुग्णांचा आकडा बराच मोठा असल्यामुळे नवी मुंबई आजारग्रस्त झाल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. सुरुवातीच्या काळात बेसुमार अशा बांधकाम क्षेत्रामुळे नवी मुंबई शहर मलेरियाग्रस्त म्हणून ओळखले जात असे. यानंतर शहरातील बांधकामाचे प्रमाण कमी झाले तसे मलेरियाची टक्केवारीही कमी झाली. नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने मलेरियाचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सुरुवातीच्या काळात अतिशय प्रयत्नपूर्वक पावले उचलली. गेल्या काही वर्षांत मात्र हे प्रयत्न तोकडे पडू लागल्याचे चित्र निर्माण झाले असून यावर्षी तर शहरात डेंग्यूने आजारी असलेल्या रुग्णांची आकडेवारी वाढू लागल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात आरोग्य विभागाकडून डासअळीनाशक मोहीम मोठय़ा प्रमाणावर राबवली जाते. यंदाही अशा प्रकारे मोहीम राबवली गेल्याचा दावा घनकचरा विभागामार्फत केला जात असला तरी डास निर्मिती क्षेत्र शोधण्यात फारसे यश आले नसल्याची टीका नुकत्याच झालेल्या स्थायी समिती सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. घनकचरा विभागाचा कार्यभार पाहणारे उपायुक्त अजीज शेख यांच्या कामगिरीविषयी फारशी सकारात्मकता महापालिका वर्तुळात नाही. आरोग्य विभागाची कामगिरी ढासळण्यास घनकचरा विभागातील गलथान कारभार जबाबदार असल्याची टीकाही उघडपणे होऊ लागली आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरात शहरात मलेरियासदृश तापाने २७५ तर डेंग्यूने ५० रुग्ण आजारी असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती आरोग्य अधिकारी सुधीर निकम यांनी दिली. डेंग्यू रुग्णांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठविले असता आतापर्यंत १५ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत, असा दावाही निकम यांनी केला. आतापर्यंत तीन रुग्ण डेंग्यूने दगावले आहेत, असेही ते म्हणाले. दरम्यान, आरोग्य विभागाकडील अहवालापेक्षा परिस्थिती अधिक गंभीर आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे वाशीतील नगरसेवक वैभव गायकवाड यांनी केली. नगरसेवकांचा दबाव वाढल्यानंतर प्रभागात डासअळीनाशक मोहीम राबवली जाते. मात्र ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता आहे, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार मलेरिया आणि डेंग्यूने आजारी असलेल्या रुग्णांचा आकडा शेकडोंमध्ये असला तरी शहरातील काही हजार रुग्ण मलेरियासारख्या आजारांनी ग्रस्त आहेत, अशी माहिती वाशीतील एका मोठय़ा रुग्णालयातील व्यवस्थापकांनी दिली. डेंग्यूने आजारी असलेल्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे, असेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
नवी मुंबईत मलेरिया, डेंग्यूचे थैमान
नवी मुंबई महापालिकेच्या अक्षम्य अशा दुर्लक्षामुळे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील सर्व उपनगरांमध्ये डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांची साथ पसरली असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आरोग्य यंत्रणा अपयशी ठरत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होऊ लागला आहे.
First published on: 01-10-2013 at 08:57 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue maleria patients in navi mumbai