डेंग्यू झालेल्या ८० टक्के रुग्णांच्या घरात ‘एडिस इजिप्ती’ डासांच्या अळ्या सापडलेल्या असल्याने आठवडय़ातून किमान एकदा पाण्याची भांडी सुकवण्यासोबत ती व्यवस्थित धुण्याचा सल्ला कीटकनाशक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. एडिस डासांची अंडी भांडय़ाला चिकटून राहतात आणि वर्षभराच्या काळानंतरही त्यातून डासांची उत्पत्ती होण्याचा धोका असल्याने केवळ भांडी सुकवून पूर्ण नियंत्रण न होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
जुलच्या पहिल्या चार दिवसांत डेंग्यूचे ३० रुग्ण आढळल्याने महानगरपालिकेने डासविरोधी मोहीम तीव्र केली आहे. डेंग्यू झालेल्या रुग्णाच्या परिसरात या डासांचा शोध घेतल्यावर ८० टक्के रुग्णांच्या घरातच डासांच्या अळ्या सापडल्या आहेत. पालिकेचे कर्मचारी प्रत्येक घरातील डास काढू शकत नसल्याने कोणत्याही भांडय़ात आठ दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी साठू न देण्याची घबरदारी प्रत्येकाने घेण्याची गरज आहे. मलेरिया पसरवणारे ‘अ‍ॅनाफिलिस’ डास या उपायांनी नष्ट होत असले तरी जीवसृष्टीत टिकण्याची धडपड करणारे ‘एडिस इजिप्ती’ (डेंग्यू पसरवणारे) डास मात्र चिवट असतात.
प्रत्येक सजीव टिकून राहण्याची धडपड करत असतो. एडिस इजिप्ती डासांच्या अळ्या पाण्याच्या पातळीच्या जरा वर अंडी चिकटवतात. पाणी त्या पातळीला पोहोचले की त्या अंडय़ांमधून अळ्या, कोष व डासनिर्मितीला सुरुवात होते. पावसाळ्याच्या अखेरच्या दिवसांत घातलेली अंडी पाण्याची पातळी वर न गेल्याने तशीच राहतात. दुसऱ्या वर्षीच्या पावसाळ्यात पाण्याची पातळी या अंडय़ांपर्यंत पोहोचली की डासउत्पत्ती होते. जगभरात झालेल्या संशोधनात हे दिसून आले आहे, असे कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नािरग्रेकर यांनी सांगितले. त्यामुळेच पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून एप्रिल महिन्यापासून पाणी साठू शकणाऱ्या वस्तू, छपरावर घातलेले निळे प्लास्टिक, टायर, मोडीत काढलेली भांडी काढून टाकली जातात. यावर्षी अशा साठ हजारांवर वस्तू काढून टाकण्यात आल्या आहेत. मात्र तरीही पावसाळ्याच्या काळात आणि मुख्यत्वे घरात इजिप्ती डासांची निर्मिती होण्याचा धोका जास्त आहे. अंडी भांडय़ाला चिकटून राहत असल्याने वस्तू घासून धुतल्याशिवाय ती निघत नाहीत. प्रत्येक डास एका वेळेस शंभर ते दीडशे अंडी घालतो. एक डास साधारण दोन ते तीन आठवडे जगतो व त्यातून तो शेकडो रहिवाशांना डेंग्यूची लागण करू
शकतो.
डासांची निर्मिती रोखणे नागरिकांच्याच हातात
अवघ्या आठ दिवसांत डास जन्माला येत असल्याने एवढय़ा कमी वेळात प्रत्येक घरात पालिकेचे कर्मचारी येऊन तपासणी करू शकत नाहीत. धूर फवारणी हा डासांना मारण्याचा सर्वात शेवटचा उपाय आहे. मात्र डासांची निर्मिती रोखणे नागरिकांच्या हातात आहे. डेंग्यूचा प्रसार करणारे डास साठलेल्या स्वच्छ पाण्यात अंडी घालतात व या पाण्यातील डासांच्या निर्मितीच्या अंडी-अळी-कोष या अवस्था आठ दिवसांच्या असतात. त्यामुळे घरातील िपप, ड्रम, बादल्या, पाणी साठविण्याची भांडी यातील पाणी आठवडय़ातून किमान एक वेळा पूर्णपणे बदलले पाहिजे, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
डासांची निर्मिती
कुठे होऊ शकते?
फेंगशुई रोपटे, बांबूचे रोपटे, मनीप्लँट्स यासारखी शोभिवंत झाडे, कुंडय़ांखालील ताटल्या, वातानुकूलन यंत्रणा, शीतकपाट (फ्रिज), टायर, नारळाच्या करवंटय़ा, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक.

Story img Loader