देऊळगावराजा शहराच्या पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता तातडीने खडकपूर्णा ते देऊळगावराजा या मार्गावर ३६ कि.मी.वर २३ टॅंकर मंजूर केले असले तरी पालिका प्रशासनाच्या संगनमताने दिवसाआड दहा ते बारा टॅंकर केवळ अर्धा कि.मी. वरून एका खासगी विहिरीवरून भरत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सध्या पाणीटंचाईच्या काळात शहराला दररोज ११ लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. शहराला सध्या २५ दिवसाआड पाणीपुरवठा होत असला तरी पीरकल्याण व सावखेड भोई येथून पाणीपुरवठय़ाचे स्त्रोत सध्या संपूर्णत: बंद झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी २३ टॅंकर मंजूर केले आहेत. यात ३ टॅंकर १६ मेट्रिक टन म्हणजे १६ हजार लिटर, तर २० टॅंकर दहा हजार लिटर क्षमतेचे आहेत. निविदेप्रमाणे हा ठेका उत्तर प्रदेशचे ठेकेदार अमरसिंग यांनी घेतलेला असून खडकपूर्णा ते देऊळगांवराजा अंतर ३६ कि.मी.चे आहे. शहरातील संजयनगरमध्ये असलेल्या टाकीची क्षमता ४.५ लाख लिटर, खंडोबा टेकडीवरील टाकीची क्षमता ६.५ लाख लिटर, तर आठवडी बाजारातील टाकीची क्षमता २.७० लाख लिटर एवढी आहे. दिवसभरात हे टॅंकर ६० ते ७० फेऱ्या मारत असल्याची माहिती कैलास माने यांनी दिली, तर २२ डिसेंबर रोजी यामधील काही टॅंकर जलशुध्दीकरण केंद्रापासून अवघ्या अर्धा कि.मी. वर असलेल्या एका शेतातील खासगी विहिरीवरून भरून आणत असल्याची माहिती मिळाली.
टॅंकर भरणाऱ्यांची, तसेच पालिका कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादाराव खार्डे यांनी प्रभारी पाणीपुरवठा निरीक्षक सन्मती जैन यांना मोबाईलवरून विचारपूस केली, तर युवा सेनेचे तालुका युवा अधिकारी दत्ता काळे यांनी मुख्याधिकाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी तो होऊ शकला नाही. हा प्रकार काही पत्रकारांनी उघडकीस आणल्यानंतर शिवसेनेचे तालुकाप्रमुख दादाराव खार्डे यांनी या प्रकरणी सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करू असे सांगितले.