मुंबईच्या फिंगर प्रिंट विभागात आजही संगणक नसल्याने तेथील तज्ज्ञांना पारंपरिक पद्धतीनेच बोटांचे ठसे तपासावे लागत आहेत. यामुळे वाढत्या गुन्हेगारीच्या काळातही लाखो ठशांमधून आरोपींचे ठसे तपासावे लागत असल्याने त्यातून चुका होऊन न्यायालयात आरोपींना त्याचा फायदा मिळू शकतो.
अंगुली मुद्रा अर्थात फिंगर प्रिंट विभागाचे मुख्यालय पुणे येथे असून मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबाद येथे ब्युरो कार्यालये आहेत. तसेच राज्यभरात विभागाची ४१ केंद्रे आहेत. गेल्या दीड वर्षांपासून मुख्य सव्‍‌र्हर बंद असल्याने येथील तज्ज्ञांना बोटांचे ठसे पारंपरिक पद्धतीनेच तपासावे लागत आहे. (याबाबत लोकसत्ताने २१ मार्च २०१३ रोजी वृत्त दिले होते) पंरतु अजूनही संगणक उपलब्ध नसल्याने तज्ज्ञांना लिनियन टेस्टर (सराफ वापरतात ते यंत्र) वापरून ठसे तपासावे लागत आहेत.
हे काम संगणकाशिवाय काम करणे ही कल्पनाच हास्यास्पद आहे. यापूर्वी ‘फिंगर अ‍ॅनालिसिस अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग सिस्टिम’ कार्यरत होती. पण २००४ साली ती बंद पडली. विशेष म्हणजे फिंगर प्रिंट विभागाचा सव्‍‌र्हरही बंद आहे. मुंबईच्या कार्यालयात दोन लाख गुन्हेगारांच्या नोंदी आहेत. सुमारे एक हजार फायलींमध्ये या नोंदी ठेवल्या आहेत. एखाद्या गुन्हेगाराच्या ठशांची पडताळणी करायची असल्यास या फायलींमधील नोंदी तपासाव्या लागतात. हाताने ही तपासणी करावी लागत असल्याने त्यात मानवी चुका होण्याची शक्यता असते. याशिवाय जराही चूक झाली की न्यायालयात त्याचा फायदा आरोपींना मिळतो. राज्यातील ९५ लाख गुन्हेगारांचे ठसे उपलब्ध असून त्यांच्या संगणीकृत नोंदी करण्याचे काम सुरू असल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले.
अपुरे तज्ज्ञ, कोंदट खोली
मुंबईतल्या फिंगर प्रिट कार्यालयाचे ठिकाण कोंदट आणि अपुऱ्या जागेत आहे. तेथेही तज्ज्ञांची कमतरता आहे. सध्या ९ तज्ज्ञ काम करत आहेत. पुरेसा प्रकाश नसल्याने काम करण्यात अडथळा येतो. ठसे तपासतांना डोळ्यांना ताण पडतो. त्यामुळे दोन तासांपेक्षा अधिक वेळ बसता येत नाही, असे येथील तत्रांनी सांगितले. मुंबई ब्युरोला स्वतंत्र संचालकही नेमण्यात आलेला नव्हता. एवढी बिकट अवस्था असल्याने या विभागाबद्दल प्रशासन आणि यंत्रणा किती गंभीर आहे ते स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा