जलसंपदा विभागाच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेदरम्यान झालेल्या पेपरफुटीच्या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरू केली असून नागपूर येथून प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचे सांगण्यात येते. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर ‘प्रिव्हेन्शन ऑफ मालप्रॅक्टिसेस’ कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
जलसंपदा विभागाच्या विविध पदांसाठी अमरावतीत लेखी परीक्षा रविवारी पार पडली. यात कनिष्ठ लिपीक, मोजणीदार, सहायक भांडारपाल, टंकलेखक, कालवा निरीक्षक या पदांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका बाहेर आल्याचे एका युवकाच्या सतर्कतेने निदर्शनास आले. पेपरफुटीच्या या प्रकरणामुळे जलसंपदा विभागात खळबळ उडाली असून प्रश्नपत्रिका ‘लीक’ करण्यात जलसंपदा विभागातील काही कर्मचाऱ्यांचे संगनमत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात लाखो रुपयांचा व्यवहार झाल्याचा कयास आहे. जलसंपदा विभागातर्फे क श्रेणीतील सुमारे २०४ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असून विविध संवर्गामध्ये रविवारी परीक्षा झाली. या परीक्षेत सुमारे १३ हजार उमेदवार सहभागी झाले होते. कनिष्ठ लिपीक, मोजणीदार, सहायक भांडारपाल, टंकलेखक, कालवा निरीक्षक या पदांसाठी जी प्रश्नपत्रिका उमेदवारांना देण्यात आली होती, त्यातील ३० प्रश्न परीक्षेपूर्वीच बाहेर आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या पदासाठी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची फेरपरीक्षा अटळ मानली आहे.
प्रश्नपत्रिकेत २०० गुणांचे प्रश्न विचारले होते. परीक्षा सुरू होण्याआधीच अनेकांना प्रश्नपत्रिका मिळाल्याचे उघड झाले.फॉरेस्ट कॉलनीतील अंचल खंडारे या युवकाला जलसंपदा विभागाचा पेपर फुटल्याचे कळल्यावर त्याने ही माहिती फ्रेझरपुरा पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने ही माहिती जलसंपदा विभागाच्या दक्षता पथकाला कळवले. परीक्षा सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी हा प्रकार माहिती झाल्याने जलसंपदा विभागात खळबळ उडाली. नंतर परीक्षा पार पडली खरी, पण या काळात कार्यकारी अभियंता प्रकाश नागपूरकर यांनी फुटलेल्या प्रश्नपत्रिकेची पडताळणी केली तेव्हा परीक्षेतील २९ प्रश्न तंतोतंत जुळले. त्यामुळे पेपर फुटल्याच्या घटनेवर शिक्कामोर्तब झाले. नागपूरकर यांनी या संदर्भात फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर ‘प्रिव्हेन्शन ऑफ मालप्रॅक्टिसेस’ कायद्याअंतर्गत अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात सागर बाहेकर या व्यक्तीचे नाव समोर आले असून पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आहे. पेपरफुटीचे तार नागपूर येथे जुळले आहेत. परीक्षा सुरू होण्याच्या ऐन वेळी हा प्रकार समोर आल्याने अचानक परीक्षा रद्द करणे शक्य नव्हते. त्यामुळे सर्व उमेदवारांना तीच प्रश्नपत्रिका देण्यात आली, असे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे. फेरपरीक्षा घेण्यासंदर्भात सोमवारी निर्णय अपेक्षित होता. या संदर्भात प्रकाश नागपूरकर यांच्याशी संपर्क साधला असता ते बैठकीत व्यस्त असल्याचे सांगण्यात आले.
जलसंपदा विभागाच्या पेपरफुटीचे’धागे’ नागपुरात
जलसंपदा विभागाच्या सरळ सेवा भरती प्रक्रियेदरम्यान झालेल्या पेपरफुटीच्या प्रकरणाची चौकशी पोलिसांनी सुरू केली
आणखी वाचा
First published on: 22-10-2013 at 08:28 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Department of water resources exam papers leak in nagpur