‘अबीर गुलाल उधळीत रंग, नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग’ या ओळी नाथाघरची पांडुरंग भक्ती सांगणाऱ्या. काळ बदलला, नाथांच्या वंशजांमध्ये वाद झाले. ते पराकोटीला गेले. प्रकरण न्यायालयात गेले. पालखी कोणी उचलायची, हेदेखील या वर्षी न्यायालयानेच ठरविले आणि पैठणच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन पालख्या पांडुरंगांच्या दर्शनासाठी निघाल्या. सकाळी नाथमहाराजांचे वंशज रावसाहेब गोसावी यांना प्रशासनाने बजावून सांगितले, सर्वोच्च न्यायालयाचा व उच्च न्यायालयाचाही निकाल तुमच्या विरोधात आहे. तेव्हा तुमची पालखी दुपारी साडेतीन वाजता निघेल, असे बघा. त्यांनी दुपारी प्रस्थान केले आणि सायंकाळी साडेसहा वाजता मुख्य दिंडी सोहळ्यास रघुनाथबुवा पांडव यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली आणि हजारो वारकऱ्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले. पालखी सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता.
पेरण्या झाल्या की, काळ्या आईची चिंता पांडुरंगाला, असे म्हणत ग्रामीण भागातील शेतकऱ्याला वारीचे वेध लागतात. कधी एकदा पांडुरंगाचे दर्शन घेऊ, यासाठी तो आसुसलेला असतो. भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन आजही परंपरेनुसार वारकरी पैठणनगरीत दाखल झाले. या वर्षी कोणत्या पालखीत जायचे, यावरूनही चर्चा होती. दुपारी साडेतीनच्या दरम्यान रावसाहेब गोसावी यांनी घरातील नाथांच्या पादुकांसह पंढरपूरकडे प्रस्थान केले. सायंकाळी मुख्य सोहळा झाला आणि वारकरी पुढच्या मुक्कामी निघाले. या वर्षी पालखी कोणी काढायची, यावरून मोठा वाद झाला. नाथाघरी दत्तक गेलेल्या रघुनाथबुवा पांडव यांच्याकडे ग्रामस्थांनी पालखीही दिली. नाथांच्या पादुका ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी स्वखर्चाने पालखी बनवून घेतली होती. ती एवढे दिवस रावसाहेब गोसावी यांच्याकडे होती. काही दिवसांपूर्वी गावकऱ्यांनी पुन्हा मागून घेतली आणि नाथांच्या पादुका ज्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या, त्यांच्याकडे पालखीही देण्यात आली. आज या पालखीत नाथांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले आणि पालखीचे प्रस्थान झाले. दरवर्षीप्रमाणे नाथांची भारुडे म्हणत टाळमृदुंगाच्या गजरात पालखीने प्रस्थान केले.