आर्णी येथील भगवंत पतसंस्था डबघाईस आली असून या पतसंस्थेत ठेवीदारांच्या लाखो रुपयांच्या ठेवी अडकल्याने ठेवीदार संभ्रमात असून त्यांनी आमच्या ठेवी परत करा, असा तगादा या पतसंस्थेकडे केला असला तरी पतसंस्थेतील ठेवीच सुरक्षित नसल्याचे स्पष्ट झाल्याने ठेवीदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या संस्थेवर प्राधिकृत अधिकारी म्हणून आर.एस. कान्टू यांची नियुक्ती करण्यात आल्याने आता तरी आम्हाला न्याय मिळू शकतो, अशी आशा ठेवीदारांमध्ये निर्माण झाली आहे.
पतसंस्थेतील संचालक, कर्मचारी, तसेच आर.डी. एजंट यांनीच ही पतसंस्था डबघाईस आणल्याचा आरोप ठेवीदारांकडून होत असताना प्राधिकृत अधिकारी म्हणून कान्टू यांच्या निवडीला महत्त्व प्राप्त झाले आहे. ठेवीदारांना दिलासा मिळावा, यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे कान्टू यांनी दूरध्वनीवरून ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. संस्था डबघाईस आल्याने ठेवीदार मात्र हवालदिल असून पतसंस्थेतील ठेवी परत करा, अशी वारंवार मागणी करूनही मिळत नसल्याने आर्थिक अडचणीत ठेवीदार सापडला आहे.
या पतसंस्थेत ठेवीदारांची २ कोटी ७४ लाख रुपयापर्यंत ठेवी असून त्या आता अडकल्या आहेत. या पतसंस्थेने मात्र १ कोटी ९३ लाखाचे कर्ज वाटप केलेले असून कर्जाची वसुली होत नसल्याने ही संस्था डबघाईस आलेली आहे. त्यामुळे अफरातफर करणाऱ्यांचा शोध घेत ठेवीदारांच्या जमा ठेवी त्यांना तात्काळ परत कराव्या, अशी भूमिका आता कान्टू यांना घ्यावयाची असून त्यांना कर्जदाराकडील वसुलीसाठी तगादा लावण्याची आवश्यकता आहे. पतसंस्थेच्या ठेवीदारांना बोलावून प्राधिकृत अधिकारी कान्टू यांनी व्यथा जाणून घेतल्या व पतसंस्थेच्या कारभाराची चाचपणी केली. दोन्ही लोकांवर कडक कारवाईची शक्यता वर्तविली जात असून काही प्रमाणात ठेवीदारांना न्याय मिळण्याची शक्यता आता बळावली आहे.