गेल्या सलग तीन वर्षांत प्रथमच दुचाकी वाहन विक्रीच्या आकडय़ांना प्रादेशिक परिवहन विभागात उणे चिन्ह लावावे लागले आहे. विशेषत: जालना शहरात दुचाकींची विक्री एप्रिल ते जुलैअखेर १ हजार ७९ने घटली. गेल्या वर्षी जूनमध्ये जालना जिल्हय़ात ४ हजार ७६० दुचाकी वाहने विकली गेली. या वर्षी तेथील विक्री ३ हजार ६८१ असल्याच्या नोंदी परिवहन विभागाकडे आहेत. तुलनेने औरंगाबाद शहरात तशी घट नसली, तरी दुचाकी विक्रीत लक्षणीय वाढही झाली नाही. जागतिक मंदीमुळे उत्पादनात घट आणि विक्रीही मंदावली आहे. जालन्याच्या स्टील उद्योगावर मंदीचे सावट असतानाच औरंगाबाद शहरातील बांधकाम व्यावसायिक मात्र या क्षेत्रात अजूनही ‘ऑल इज वेल’ असल्याचा दावा करतात.
गेल्या वर्षीच्या दुष्काळाचे परिणाम मराठवाडय़ाच्या वाहन व उद्योग दिसू लागले आहेत. विविध क्षेत्रांतील विक्रीचा वेग मंदावला आहे. मागील वर्षी दुचाकी वाहन विक्रीचा वेग कमालीचा वाढला, तेव्हा औरंगाबाद शहरातून ६५ हजार ३५९ वाहनांची प्रादेशिक परिवहन विभागात नोंद झाली. तत्पूर्वी २०११मध्ये ३७ हजार ३७७ दुचाकींची विक्री झाली. तुलनेने चालू वर्षी काहीशी वाढ दिसत असली, तरी गेल्या चार महिन्यांत दुचाकी विक्रीचा वेग संथच म्हणता येईल. एप्रिल ते जुलै २०१२मध्ये औरंगाबाद शहरात १८ हजार ५४० दुचाकी वाहने विकली गेली. गेल्या ४ महिन्यांत प्रादेशिक परिवहन विभागात नोंद झालेल्या वाहनांची संख्या १९ हजार ८०१ आहे. शहरातील विक्रीचा वेगही तसा कमी आहे. मात्र, तो अजूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक म्हणता येईल, असा आहे.
विक्रीकराचेही तीन महिन्यांच्या उद्दिष्टाला बाधा निर्माण होईल, असे चित्र नाही. या तीन महिन्यांत औरंगाबाद शहरात विक्रीकरापोटी ८०९ कोटी रुपये मिळणे अपेक्षित होते. त्यापेक्षा अधिक ८१९ कोटींचा महसूल वसूल झाला.
मुख्यत: जालना व बीड जिल्हय़ांमधून मिळणारा विक्रीकराचा हिस्सा मात्र कमी झाला आहे. या वर्षांत जालन्यातून ८२ कोटी ७९ लाख रुपये मिळणे अपेक्षित होते. तो महसूल कमी झाला आहे. ६४ कोटी ४५ लाख रुपये एवढाच विक्रीकर मिळाल्याची आकडेवारी सहायक विक्रीकर आयुक्तांकडे उपलब्ध आहे.

Story img Loader