समाधानकारक पावसामुळे नगर शहरास पाणीपुरवठा होणा-या मुळा धरणात ७२ टक्के पाणी साठा होऊनही महापालिकेने टंचाई काळात केलेली शहराची पाणी कपात बंद केलेली नाही. धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने मनपाला पूर्ण क्षमतेने पाणी उपसा करणे शक्य आहे तरीही प्रशासनाने पाणी पुरवठा पुर्ववत करण्याचा निर्णय अद्यापि घेतलेला नाही याकडे लक्ष वेधत उपमहापौर गीतांजली काळे यांनी शहर व उपनगरास मनपाने नियमित व पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करावा अशी मागणी केली आहे.
काळे यांनी या मागणीचे पत्र मनपा आयुक्तांना दिले आहे. पत्रात त्यांनी म्हटले की, शहर व उपनगरास सध्या एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो आहे. सावेडी उपनगरातील भिस्तबाग, निर्मलनगर, श्रमिकनगर तसेच सिव्हिल हडको, मध्यवर्ती भागास अत्यंत कमी दाबाने पुरवठा होतो आहे. त्यामुळे नागरिक थेट नळाला मोटर जोडून पाणी भरतात.
धरणातील पाणीपातळी खालावल्याने ७ मे २०१३ पासून मनपा प्रशासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतला होता. मध्यवर्ती भागासह उपनगरांना एक दिवसाआड पुरवठा करण्यात आला. जून व जुलैमध्ये समाधानकारक पाऊस होऊन धरणातील पाणी साठा ७२ टक्के झाला तरीही अद्यापि पाणी कपात बंद झालेली नाही. धरणातील पाणीपातळीत वाढ होऊन पूर्ण क्षमतेने पाणी उपसा करणे शक्य आहे, त्यामुळे पाणीपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
उपमहापौरांचे आयुक्तांना पत्र शहराची पाणीकपात बंद करा
समाधानकारक पावसामुळे नगर शहरास पाणीपुरवठा होणा-या मुळा धरणात ७२ टक्के पाणी साठा होऊनही महापालिकेने टंचाई काळात केलेली शहराची पाणी कपात बंद केलेली नाही.
First published on: 03-08-2013 at 01:43 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deputy mayor give letter to commissioner for closing water reduction of city