‘हो पृथ्वी साफ, मिटे रोग अभिशाप’ असा संदेश देत डेरा सच्चा सौदाच्या तब्बल पाच लाख कार्यकर्त्यांनी झाडू हातात घेत अवघी मुंबई झाडून काढली. संत गुरमीत राम रहीमजी इन्सान या डेरा सच्चा सौदाच्या गुरूंच्या उपस्थितीत या अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी गुरूजींना स्वत: हातात झाडू घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना स्वच्छतेचा संदेश सर्वत्र पसरविण्यास प्रोत्साहन दिले.
दिग्दर्शक पहलाज निहलानी, जितू अरोरा, अभिनेत्री पूनम धिल्लन, पूनम सिन्हा, गायक उदीत नारायण, देवराज सन्याल आदी मान्यवर वांद्रे-कुर्ला संकुलात सुरू झालेल्या या स्वच्छता अभियानाला उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता अभियानाचा नारा देण्यापूर्वी तीन वर्षे आधीच डेरा सच्चा सौदाने जगभरातच स्वच्छता अभियानाची हाक दिली होती, याची आठवण गुरूजींनी यावेळी करून दिली. आतापर्यंत १०४ स्वच्छता अभियानांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वच्छतेची ठिकाणे
आझाद मैदान, ओव्हल मैदान, शिवाजी पार्क, सांताक्रुझ, गोरेगाव, जेजे उड्डाणपूल, चेंबूर, गोवंडी, सायन, कुर्ला अशा २५ ठिकाणी हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाकरिता महाराष्ट्रासह देशभरातून कार्यकर्ते आले होते. या अभियानाचा भाग म्हणून मुंबईत तब्बल ६०० कचऱ्याचे डबे ठिकठिकाणी लावण्यात आले. तसेच, सायंकाळी रक्तदान अभियानाचेही आयोजन करण्यात आले.
या देशात कुठेही थुंकण्यास, लघुशंका करण्यास परवानगी लागत नाही. परंतु, हे स्वच्छता अभियान राबविण्यासाठी आम्हाला विविध परवानग्या घ्याव्या लागल्या. त्यामुळे, मुंबईत या अभियानाला कसा विलंब झाला.
-संत गुरमीत, डेरा सच्चा सौदाचे गुरू