स्थळ  कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय..वेळ  सोमवार सकाळी १०.३०. रुग्णालयात अचानक लगबग सुरू होते.  अस्वच्छता आणि रुग्णांची लांबलचक रांग. यामुळे एरवी नकोसे वाटणाऱ्या या रुग्णालयात युद्धपातळीवर सफाई सुरू असते. जागोजागी इमानेइतबारे काम करणारे सफाई कामगारांचे जथ्थे दिसून येतात, तर वार्डामध्ये डॉक्टरही वेळेवर आलेले असतात. ठाणे महापालिकेचे विरोधी पक्ष नेत्यांच्या दौऱ्यानिमित्त रुग्णालयात सोमवारी उत्तम व्यवस्थेचा असा सगळा माहोल दिसून आला. हा दौरा सुरू झाल्यावर मात्र रुग्णालयातील अव्यवस्थेचे िबग हळूहळू फुटू लागले आणि एखाद्या लहान शस्त्रक्रियेसाठीही याठिकाणी तीन तीन महिने कसे ताटकळत राहावे लागते, अशा तक्रारींचा अक्षरश पाऊस सुरू झाला.
कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या दारुण अवस्थेविषयी ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. या तक्रारीनंतर येत्या आठ दिवसांत येथील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याचे आश्वासन गुप्ता यांनी दिले. या आश्वासनानंतरही कळवा रुग्णालयातील आरोग्य सुविधेमध्ये तसूभरही सुधारणा झालेली नसल्याचे चित्र सोमवारी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे यांनी काढलेल्या दौऱ्यातून दिसून आले. जगदाळे यांच्यासोबत लोकशाही आघाडीचे गटनेते संजय भोईर, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक रवींद्र फाटक यांच्यासह स्थानिक नगरसेवकांचा जथ्था यावेळी उपस्थित होता. एरवी अस्वच्छ असणारा रुग्णालयाचा आवार यावेळी स्वच्छ झाल्याचे चित्र दिसत होते. या दौऱ्याची आधीच कल्पना असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी रविवारी रुग्णालय सफाईचे काम हाती घेतले होते. मात्र, वर्षांनुवर्षे देखभाली अभावी काळ्या-ठिक्कर पडलेल्या रुग्णालयाच्या भिंती मात्र जैसे थे होत्या. काही विभागात बाहेरील बाजूस कबुतरांची घरटीही दिसून आली.
 महापालिका दरवर्षी औषध खरेदीसाठी अर्थसंकल्पात कोटय़वधी रुपयांची तरतूद करते. तरीही रुग्णांना औषधे बाहेरून आणावी लागतात, अशा तक्रारी या दौऱ्यानिमीत्त पुढे आल्या. रुग्णालयातील मेडिकल बंद असल्याचे कारण प्रशासनाकडून पुढे केले जाते. सोनोग्राफी सेंटरमधील यंत्रे जळाली असून त्यापैकी एक यंत्र कार्यरत आहे. तरीही अनेक रुग्ण सोनाग्राफीच्या प्रतीक्षेत असतात. ‘आईच्या मानेला गाठ असून त्यावर उपचार सुरू आहेत. पण, चाचण्या करण्यासाठी बाहेर पाठविले जाते. त्यामुळे उपचारासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी खेटे मारावे लागतात, अशी तक्रार गिरधारी कुशवाह यांनी दिली. पोटाची शस्त्रक्रिया करण्यासाठी गेल्या १५ दिवसांपासून रुग्णालयात खेटे घालत असून चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आता शस्त्रक्रियेसाठी तीन महिन्यांनंतरची तारीख दिली आहे, असे सांगली, जत येथून आलेल्या फुलाबाई यांनी सांगितले.
रुग्णालय व्यवस्था आजारी..
स्वच्छतेचा अभाव असलेल्या कळवा रुग्णालयात अनेक वॉर्ड तसेच चाचणी केंद्रांच्या परिसरात वीजच नसल्याचे चित्र दिसून आले. या ठिकाणी टय़ूबलाइट तसेच ब्लबची सुविधाच नसल्याने पूर्णपणे अंधारात रुग्णांना उभे राहावे लागते. मात्र, रुग्णालयाच्या अधिष्ठात्री सी. मैत्रा यांच्या केबीनमध्ये विजेचा झगमगाट दिसून आला. रुग्णालयातील शौचालयांची दारे तुटली असून त्याठिकाणी अस्वच्छता आहे. डॉक्टर्सकरिता ग्लोज उपलब्ध नाहीत. पाण्याची व्यवस्था नाही. न्युरोसर्जन आणि हद्यरोग तज्ज्ञ नाहीत, रुग्णालयातील औषधाचे दुकान बंद आहे, अशी रुग्णालयाची अवस्था आहे.
अपघात कक्ष बंदच
ठाणे महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी मोठा गाजावाजा करत कळवा रुग्णालयात नव्या अत्याधुनिक अपघात विभाग कक्ष आणि मुख्य शस्त्रक्रिया विभागाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते १४ मे २०१३ रोजी उद्घाटन केले होते. त्यापैकी अत्याधुनिक अपघात कक्ष कार्यन्वित करण्यात आला. मात्र, मुख्य शस्त्रक्रिया विभाग अद्याप सुरू झालेला नाही, असे चित्र दिसून आले. या कक्षाचे काम पूर्ण होत आले असून लवकरच सुरू होईल, असे प्रशासनाने यावेळी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा