नागपूर ग्रामीणमधील मतदारसंघात ‘देशमुख जिंकले, देशमुख हरले’ याचा प्रत्यय आज जिल्ह्य़ातील नागरिकांना बघावयास मिळाला. रिंगणात असलेल्या तीन देशमुखांपैकी एक देशमुख जिंकले तर दोन देशमुखांना पराभवाला तोंड द्यावे लागले. जे हरले त्यांना हा पराभव चांगलाच जिल्हारी लागला आहे, तर जे जिंकले त्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व गेल्या पंधरा वर्षांपासून मंत्री असणारे अनिल देशमुख, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचे थोरले पुत्र आशिष देशमुख आणि धाकटे पुत्र डॉ. अमोल देशमुख हे तीन देशमुख विधानसभेच्या रिंगणात होते. यातील अनिल देशमुख आणि आशिष देशमुख यांचा कल काँग्रेसच्या विरोधात राहिला आहे. पहिल्यांदा अनिल देशमुख हे स्वतंत्र म्हणून निवडून आले. युतीच्या राज्यात ते मंत्री राहिले. यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचा हात धरला. राष्ट्रवादीच्या तिकीटावर ते तिनदा निवडून आले. तिन्हीवेळा विजयी झाले. यावेळी मात्र स्वतचेच पुतणे आशिष देशमुख यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
या निवडणुकीत आशिष देशमुख हे नशिबवान ठरले. सावनेर मतदारसंघातूनच त्यांना उमेदवारी द्यावी, असा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घेतला होता. कारण २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे सुनील केदार यांना चांगलीच टक्कर दिली होती. परंतु ऐनवेळी येथील स्थानिक कार्यकर्ते सोनबा मुसळे यांनी बंडाचा झेंडा उगारला. त्यामुळे पक्षाने त्यांना उमेदवारी दिली. अशा स्थितीत आशिष देशमुखांना कोठून उमेदवारी द्यावी, असा प्रश्न पक्ष श्रेष्टींना पडला. शेवटी त्यांना काटोल मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. यावेळी अनिल देशमुखांच्या विरोधात असलेली नाराजी आशिष देशमुखांच्या पथ्यावर पडली आणि ते प्रचंड मतांनी निवडून आले. येथील मतदारांनी एका देशमुखांना नाकारले तर दुसऱ्या देशमुखांना स्वीकारले. त्यामुळे ‘देशमुख जिंकले ; देशमुख हरले’ अशी चर्चा आता सुरू झाली आहे. तर दुसरीकडे काही का असे ना, देशमुखांच्या घरात आमदारकी तर आली ना, असेही बोलले जात आहे.
वडील काँग्रेसी असले तरी आशिष देशमुख हे काँग्रेसपासून दूर होते. गेल्या काही दिवसांपासून ते भाजपशी जुळले होते. भाजप निष्ठेमुळे याहीवेळी उमेदवारी दिली जाईल, असे आश्वासन त्यांना वरिष्ठांनी दिले होते. दिलेले आश्वासन वरिष्ठांनी पाळले. तर मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा आशिष देशमुखांनी घेतला.
रणजित देशमुखांचे धाकटे पुत्र डॉ. अमोल देशमुख यांनी गेल्या काही दिवसांपासून रामटेक मतदारसंघात आपली पाळेमुळे रुजवण्याचा प्रयत्न चालवला होता. त्यामुळे यावेळी डॉ. अमोल देशमुख यांना काँग्रेसची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. परंतु गेल्यावेळचे काँग्रेसचे उमेदवार सुबोध मोहिते यांनाच काँग्रेसची उमेदवारी मिळाली. त्यामुळे ऐन वेळेवर डॉ. अमोल यांना नाईलाजाने राष्ट्रवादीचा झेंडा हाती घ्यावा लागला. अशाही परिस्थितीत त्यांनी निकराने मैदान मारण्याचे प्रयत्न चालवले. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. परंतु या अपयशाची पुनरावृत्ती यशात होईल, अशी त्यांना आशा आहे.
रणजित देशमुख यांचे अनिल देशमुख हे भाऊ आहेत, तर आशिष आणि अमोल हे पुत्र आहेत. अनिल देशमुख यांना त्यांनीच राजकारणात आणले आहे. आपल्याच देशमुखाकडून झालेला पराभव अनिल देशमुखांच्या अधिक जिव्हारी लागणारा ठरला आहे. रणजित देशमुख यांनी आतापर्यंत अनेक विजय आणि पराभव बघितले आहेत. परंतु आज मात्र आनंद आणि निराशा असे संमिश्र वातावरण देशमुख यांच्या घरात निर्माण झाले आहे.