सलमान खानचा ‘वाँटेड’, ‘बॉडीगार्ड’, अजय देवगणचा ‘सिंघम’ यांसारख्या चित्रपटांमुळे देमार चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. मात्र, या चित्रपटांच्या यशामुळे कलाकारांची आपापसातील स्पर्धा वाढली आहे. आपल्या प्रत्येक चित्रपटात वेगळे काहीतरी असायला हवे, असा बॉलिवूडच्या पहिल्या फळीतील कलाकारांचा आग्रह आहे. त्यामुळे देशी हाणामारीची संकल्पना लोकप्रिय झाली. आता हॉलिवूडमध्ये अॅक्शनपट गाजवणाऱ्या तज्ज्ञांना देशी हाणामारी अधिक आकर्षक करण्यासाठी पाचारण करण्याचा एकच सिलसिला बॉलिवूडमध्ये सुरू झाला आहे. सलमान खानचा ‘दबंग २’ पुढच्या महिन्यात प्रदर्शित होतो आहे. मात्र, त्याला काळजी लागली आहे ती त्याच्या पुढच्या वर्षीच्या ‘किक’ या अॅक्शनपटाची. ‘किक’ वेगळा असावा यासाठी निर्माता साजिद नाडियादवालाने हॉलिवूडच्या दोन अॅक्शन तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे.
बॉलिवूडचे पुढचे वर्ष हे अॅक्शनपटांचे आहे. हृतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला ‘क्रिश ३’ आणि यशराजचा ‘धूम ३’ हे दोन महत्त्वाचे अॅक्शनपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे सलमान खानला आपल्या ‘किक’ या चित्रपटाची काळजी लागून राहिली आहे. ‘किक’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईपर्यंत ‘क्रिश ३’ आणि ‘धूम ३’चे प्रोमोज वाहिन्यांवर दाखवायला सुरुवात होईल.
या दोन्ही चित्रपटांतील अॅक्शन लोकांना आवडली तर ‘किक’ सुरू होण्याआधीच त्यातली हवा निघून जाईल. त्यामुळे ‘किक’मधली हाणामारी ही फार वेगळ्या दर्जाची व्हायला हवी, यासाठी सलमान खान आणि निर्माता साजिद नाडियादवाला दोघेही प्रयत्नशील आहेत. त्यासाठी साजिदने ‘टेकन आणि ट्रान्सपोर्टर’सारख्या गाजलेल्या हॉलिवूडपटांचा अॅक्शन तज्ज्ञ फिलिप गुजेन आणि ‘बॅड बॉइज’, ‘डेथ रेस’सारखे चित्रपट देणाऱ्या स्पायरोची मदत घेण्याचे ठरवले आहे. फिलिप हा बॉलिवूडला नवीन असला तरी स्पायरो नाही. शाहरूखच्या ‘रा. वन’साठी स्पायरोनेच अॅक्शन स्टंट्स केले होते. त्यामुळे या दोघांकडूनही ‘किक’साठी काहीतरी वेगळे करून घ्यायचे, असा साजिदचा प्रयत्न आहे.
यापूर्वी गुप्तहेरांच्या कथेवर बेतलेल्या ‘एक था टायगर’साठी दिग्दर्शक कबीर खानने हॉलिवूड तज्ज्ञ जेम्स बॅम्फोर्डची मदत घेतली होती. तर ‘तेज’ या प्रियदर्शन दिग्दर्शित चित्रपटाचे स्टंट्सही ‘ब्रेव्हहार्ट’ आणि ‘द बोर्न अल्टिमेटम’सारख्या हॉलिवूडपटांचा अॅक्शनतज्ज्ञ पीटर प्रेडरो यांनी केले होते. आता ‘क्रिश ३’साठी श्ॉओलिन सॉसरचा अॅक्शन दिग्दर्शक टोनी चिंग याची मदत घेण्यात येते आहे. तर ‘धूम ३’च्या अॅक्शनदृश्यांची जबाबदारी ऑलिव्ह केलर या हॉलिवूड तज्ज्ञाकडे आहे. अॅक्शनपट प्रेक्षकांना आवडत असले तरी त्याच त्याच अॅक्शन्स बघणे कंटाळवाणे ठरेल आणि यामुळे कोटय़वधींच्या बजेटमध्ये तयार होणाऱ्या चित्रपटांना याचा फटका बसेल, हे लक्षात घेऊन या कलाकारांनी आपल्या चित्रपटांसाठी हॉलिवूडच्या तज्ज्ञांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे.
विदेशी तालमीत रंगतेय देशी हाणामारी
सलमान खानचा ‘वाँटेड’, ‘बॉडीगार्ड’, अजय देवगणचा ‘सिंघम’ यांसारख्या चित्रपटांमुळे देमार चित्रपटांना चांगले दिवस आले आहेत. मात्र, या चित्रपटांच्या यशामुळे कलाकारांची आपापसातील स्पर्धा वाढली आहे.
First published on: 19-11-2012 at 10:52 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Desi action in hollywood practice