गेल्या आठवडाभरात गारपीट व अवकाळी पावसाच्या तडाख्याने झालेल्या अतोनात नुकसानीमुळे हताश झालेल्या तालुकाभरातील पाचशेहून अधिक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठून तहसीलदार दीपक पाटील यांच्यापुढे अस्मानी संकटाच्या अनेक व्यथा कथन केल्या. यंदाच्या वर्षभरातील विचित्र हवामानामुळे शेती उत्पादनात लक्षणीय घट झाली असतानाच ताज्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या उरल्या-सुरल्या आशाही धुळीला मिळाल्या असून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांनी सक्तीच्या कर्ज व वीजबील वसुलीला विरोध दर्शवून शासनाने कर्जमाफी द्यावी अशी आग्रही मागणीही केली.
आपली गाऱ्हाणी शासन दरबारी पोहोचावीत यासाठी आमदार दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली हे नुकसानग्रस्त शेतकरी एकवटले होते. गारपीट व अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे झालेली बिकट अवस्था मांडतांना अनेकांना गहिवरून आले. तद्वतच झालेल्या हानीनंतर आता उत्पन्नाचे समोर कोणतेही साधन दिसत नसल्याने शेती व कुटूंबाचा आर्थिक गाडा कसा ओढायचा या चिंतेने अनेकांना ग्रासल्याचे बघावयास मिळाले. यंदा अनेक भागात प्रारंभी अल्प पाऊस पडल्याने दुष्काळाचे सावट होते. तर पावसाळ्यानंतर अनेकदा ढगाळ हवामानाला सामोरे जावे लागण्याची विचित्र परिस्थिती उद्भवली. असे प्रतिकुल हवामान आणि विहिरींना अल्प पाणी या संकटावर मात करत मोठय़ा कसरतीने शेतकऱ्यांनी पिके व फळबागा जतन केल्या होत्या. मात्र या नैसर्गिक आपत्तीमुळे हाता-तोंडाशी आलेला घासच हिरावला गेल्याने शेतकरी आणखीच कष्टी झाल्याची प्रचिती यावेळी आली.
कांदा, डाळींब, द्राक्ष, मका, गहू, हरभरा अशा सर्वच पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याची व्यथा यावेळी मांडण्यात आली. वाके येथील एका शेतकऱ्याने सांगितले की, कर्ज काढून तीन एकर डाळिंब बाग जतन केली होती. बहार काढण्याच्या तयारीत असताना लिंबूच्या आकाराच्या गारांमुळे संपूर्ण फळे खराब होऊन होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे आता कर्ज कसे फेडावे असा प्रश्न या शेतकऱ्याने उपस्थित केला. नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीच पडणार नसल्याची खात्री झाल्याने त्यांची बाजारातली पत संपुष्टात आली असून पिकांवरील औषधांच्या दुकानदारांनी त्यांना उधार देणे बंद केल्याची कैफियत पिंपळगाव येथील शेतकऱ्याने मांडली. आजवर कधीही न बघितलेल्या अशा गारपिटीच्या तडाख्यात डाळिंब बागेचे जे नुकसान झाले ते बघून डोळे पांढरे होण्याची वेळ आल्याची व्यथा दाभाडीच्या शेतकऱ्याने मांडली. एकीकडे शेतकऱ्यांना या आस्मानी संकटाचा सामना करावा लागत असतांनाच दुसरीकडे बँकांनी थकबाकी वसुलीसाठी जप्तीचा बडगा उगारल्याबद्दल तसेच वीज बिलांच्या सुरू असलेल्या सक्तीच्या वसुलीविरोधात अनेकांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. या संकटामुळे शेतकरी वर्ग पुरता हवालदिल झाला असून त्याला दिलासा देण्याची नितांत गरज असतांना कर्जवसुलीसाठी जप्ती आणि सक्तीची वीज बील वसुली हे धोरण अन्यायकारक असल्याचे नमुद करून त्यातून संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे धोरण मागे घेण्याची मागणी आमदार भुसे यांनी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देऊन कर्जमाफीच्या मागणीलाही त्यांनी पाठिंबा दर्शविला. यावेळी सेनेचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड संजय दुसाने, पंचायत समितीच्या सभापती वंदना पवार, शेतकरी सेनेचे सुनील देवरे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश पवार, कैलास तिसगे आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा