नागपूर शहरातील गुप्तचर यंत्रणा ढेपाळली असल्याचे गेल्या दोन-तीन दिवसांच्या घटनांअंती स्पष्ट झाले असून या यंत्रणांना दक्ष ठेवण्यासाठी पोलीस आयुक्तांना जातीने कौशल्य पणास लावावे लागणार आहे. सोमवारी जिल्हा न्याय मंदिरासमोर जमावाने गोंधळ घालत दगडफेक व तोडफोड केली. कालचा घटनाक्रम तसेच जमावाची कार्यपद्धती पाहता ती पूर्वनियोजित असल्याचे लपून राहिले नाही. जमाव न्यायालयात आल्यानंतर तसेच तोडफोड सुरू केल्यानंतर पोलिसांची अक्षरश: धावाधाव झाली. यासंबंधीच्या हालचाली सुरू असल्याचे पोलिसांना आधीच समजले असते तर एवढी धावाधाव करावी लागली नसती. न्यायालय परिसरात मोठा नसला तरी पुरेसा बंदोबस्त होता आणि तेथील सतर्क बंदोबस्त प्रमुखाने आधीच खबरदारी घेत जमावाला बाहेर काढले. त्यामुळे न्यायालय परिसरात अनुचित प्रकार घडला नाही. गेल्यावर्षी १० ऑक्टोबरला रात्री संतप्त जमावाने इकबालची हत्या केली. त्या घटनेआधी कुणकुणही पोलिसांना लागली
नव्हती.
नागपूर शहरात २३ पोलीस ठाणे असून प्रत्येक ठाण्यात किमान दोन गुप्तचर असतात. पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच कार्यक्रम वा आंदोलनस्थळी कानोसा घेत गुप्त हालचाली टिपणे, ही त्यांची जबाबदारी असते. याशिवाय विशेष शाखा असून उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त कर्मचारी तेथे असतात. शहरातील गुप्त हालचाली टिपण्याचे काम त्यांच्याकडे असते. जिल्हा न्याय मंदिरासमोरील रस्त्यावर सोमवारी घडलेल्या घटनेची पूर्वमाहिती पोलिसांना मिळू शकली नाही.
रिंग रोडवर काही दिवसांपूर्वी एका दुचाकीस्वार महिलेला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. या घटनेत ती बचावली. सीसी कॅमेऱ्याने ही घटना टिपली आणि वृत्त वाहिन्यांवरून ते दाखविले जात होते.
संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकाला यासंबंधी काहीही माहिती नव्हती. किमान वृत्त वाहिन्यांवर दाखविण्यात आल्यानंतरही त्यासंबंधी माहिती घेण्याची सुबुद्धी पोलीस निरीक्षकला सुचली नाही. गुप्तचरांकडून पुरेशी माहिती मिळाली असती तर धावाधाव झाली नसती. अनेक वर्षे गुप्तचर खात्यात राहिलेल्या विद्यमान पोलीस आयुक्तांच्या नजरेतून या बाबी सुटल्या नाहीत.
खुफिया यंत्रणा ढेपाळली असल्याचे या घटनांनी स्पष्ट झाले आहे. यामुळे विद्यमान पोलीस आयुक्त अस्वस्थ झाले नसते तरच नवल. त्यांनी तशी नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली. खुफिया यंत्रणेला चुस्त ठेवण्यासाठी आता थेट पोलीस आयुक्त लक्ष ठेवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शहरात तसेच पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठल्या हालचाली सुरू आहेत, याची खुफिया यंत्रणेला जाणीव असणे गरजेचे आहे. किमान कुणकुण लागायला हवी, असे मत यासंदर्भात ‘लोकसत्ता’शी बोलताना पोलीस आयुक्त कौशल पाठक यांनी व्यक्त केले.

Story img Loader