शहराची पाणी समस्या कायमची मिटविण्यासाठी सुरू असलेल्या पाटोदा येथील वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू असून पाटोदा ते वाघदर्डी जलवाहिनी आणि शहरातील अंतर्गत जलवाहिनीचे काम कोणत्याही परिस्थितीत दोन महिन्यात पूर्ण करण्याचा निर्धार आ. पंकज भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी शिबीराचे मोफत आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन आ. भुजबळ यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजाभाऊ पगारे, यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना आ. भुजबळ यांनी मनमाड शहरातील विविध प्रश्न व तालुक्यातील विविध विकास कामांचा आढावा घेतला. शासनाने मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी पाटोदा वाढीव पाणीपुरवठा तलावाची खोली वाढविण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे पाणीसाठय़ात वाढ होणार आहे. परिणामी टंचाईच्या काळात या साठय़ामुळे मोठी मदत झाली. आता पाटोदा ते वाघदर्डी जलवाहिनी टाकण्याच्या कामास प्राधान्य देण्यात येणार आहे. परंतु या कामात अनेक अडचणी येत आहेत. पाटोदा तसेच गावठाण विभागात शेत जमिनीखालून जलवाहिनी टाकावी लागत आहे. शिवाय भारत पेट्रोलियम कंपनीची इंधनवाहिनीही याच परिसरातून गेली आहे. त्यामुळे जलवाहिनी टाकण्याच्या कामात अडचणी आल्या. परंतु या अडचणींवर मात करून काम वेगाने सुरू असल्याचे  भुजबळ यांनी नमूद केले.
नांदगाव तालुक्यात विविध विकास कामे आपण मार्गी लावली. यापूर्वी इतक्या मोठय़ा प्रमाणावर विकास कामे ग्रामीण भागात झालेली नाहीत. ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी सिंगल फेज योजना सुरू करण्याची मागणी आपण महावितरणच्या कार्यकारी संचालकांकडे प्रत्यक्ष भेट घेऊन करणार आहोत, असेही ते म्हणाले. मनमाड शहरांतील पाणीपुरवठा, ढासळलेली आरोग्य व्यवस्था आणि विविध विकास कामे याबाबत आपल्याकडून जनतेच्या अपेक्षा आहेत. परंतु नगरपालिकेच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये असंतोष दिसून येत असल्याकडे लक्ष वेधले असता शहराचा कचरा उचलण्यासाठी डम्पर, कचराकुंडय़ा, नवीन साहित्य साधने उपलब्ध करण्यात आली आहेत. लवकरच ती पालिकेला मिळतील त्यामुळे स्वच्छतेची विविध कामे मार्गी लागतील अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते बब्बुभाई कुरैशी, नगरसेवक बबलु पाटील, सचिन दराडे, धनंजय कमोदकर आदी उपस्थित होते.