कोटय़वधी रुपये खर्चून देऊळगावराजा येथे ट्रामा केअर युनिटसाठी बांधण्यात आलेली इमारत हस्तांतरित करण्यास प्रशासनाकडून चालढकल केली जात असल्याने जनतेत तीव्र नाराजी पसरली आहे. कागदोपत्रीच हस्तांतरणाचा बडेजाव केला जात असून, ट्रामा केअरमधील पदभरतीबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नसल्याने जनतेला आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे.
देऊळगावराजा शहरात ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात शासनाने जुलै २०११ रोजी सर्व सुविधायुक्त ट्रामा केअर युनिट उभारण्यास मान्यता दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने १ कोटी ५ लाख रुपये खर्चाचे अंदाजपत्रक तयार करून १ नोव्हेंबर २०११ रोजी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. इमारतीचे काम युद्ध पातळीवर करून वेळेच्या आत पूर्ण करण्यात आले. मात्र, इमारत हस्तांतरण व ट्रामा केअर युनिटमध्ये मान्य झालेले पदे भरण्यास शासनाचा आरोग्य विभाग गंभीर नसल्याचे समोर आले आहे. १० मार्च २०११ रोजी मुंबईच्या आरोग्य सेवा संचालकांनी उपसंचालकांना पत्र पाठवून वर्ग तीन व चारची पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिलेले असतांना संबंधित अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्री घोडे नाचविल्याने जानेवारी २०१३ पासून ट्रामा केअर युनिटची इमारत धुळखात पडून आहे.
या विभागाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्याकडे आघाडी सरकारने आरोग्य खात्याची जबाबदारी सोपविल्यानंतर त्यांनी त्या काळात आरोग्य विभागाशी संबंधित अनेक निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी केली. त्यांच्याच काळात विदर्भात केवळ २ ट्रामा केअर युनिट उभारण्यास मान्यता मिळाली. त्यात देऊळगाव राजा शहरातील ट्रामा केअर युनिटचा समावेश आहे. या इमारतीसाठी वित्त विभागाने १ कोटी ५ लाखांची बजेटमध्ये तरतूद केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारत बांधकामाची प्रक्रिया पूर्ण केली. या दरम्यान या ट्रामा केअर युनिटमध्ये पदे भरण्याची प्रक्रिया सुरू होणे नियमानुसार बंधनकारक होते. कारण, वर्ग १ व २ ची पदे शासनस्तरावर भरण्याची प्रक्रिया होते. वर्ग ३ ची पदे आरोग्य सेवा उपसंचालकांकडून भरली जातात, तर वर्ग ४ ची पदे जिल्हा शल्यचिकित्सकांकडून भरली जातात. याबाबत शासन निर्णयान्वये संबंधितांना पदे भरण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे. असे असतांना संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केवळ कागदोपत्रीच घोडे नाचवत जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
इमारत बांधकाम जानेवारी २०१३ मध्ये पूर्ण झाल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने आरोग्य विभागास यापूर्वीच दिले असतांना जिल्हा शल्यचिकित्सक इमारत हस्तांतरित करून घेण्याकरिता पुढाकार घेत नसल्याचे दिसून आले आहे. कोटय़वधीचा खर्च होऊन अपघातातील गंभीर जखमेवर उपचारासाठी निर्माण झालेले ट्रामा केअर युनिट सुरू करण्यास शासनाचा आरोग्य विभाग गंभीर नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
देऊळगावराजाचे ट्रामा केअर युनिट हस्तांतरणाच्या प्रतीक्षेत
कोटय़वधी रुपये खर्चून देऊळगावराजा येथे ट्रामा केअर युनिटसाठी बांधण्यात आलेली इमारत हस्तांतरित करण्यास प्रशासनाकडून चालढकल केली जात
First published on: 21-01-2014 at 08:57 IST
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deulgaon troma care unit in wainting of inaugration