पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘कॉंग्रेसमुक्त भारत’ घोषणेच्या धर्तीवर जिल्ह्य़ातील काही नेत्यांनी ‘पुसद, उमरखेड आणि महागावमधून राष्ट्रवादीला हद्दपार’ करण्याची तर काहींनी ‘काँग्रेसमुक्त यवतमाळ’च्या घोषणा देऊन विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापवणे सुरू केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असतांना यवतमाळ मतदारसंघात मात्र राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य आमदार संदीप बाजोरिया यांनी काँग्रेसचे विसर्जन करणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे जाहीर करून प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे.
गंमत अशी की, आमदार संदीप बाजोरिया यांनी काँग्रेसमुक्त यवतमाळचा नारा दिला याउलट राष्ट्रवादीलाच उमरखेड, पुसद आणि महागावमधून हद्दपार करण्याची घोषणा उमरखेडचे माजी आमदार व राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील देवसरकर यांनी करून राष्ट्रवादीच्या मंत्री मनोहर नाईक यांचे साम्राज्य ‘धनुष्यबाण’च्या ताकदीने उदध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी शपथच घेतली आहे. प्रकाश पाटलांनी सेनेकडे उमेदवारी मागितली असून पुसद मतदारसंघात नाईकांविरुध्द लढण्याची जय्यत तयारी केली आहे. उमरखेड मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने प्रकाश पाटील पुसदसाठी सेनेकडे पदर पसरून आहेत. सेनेची उमेदवारी आपल्याला हमखास मिळणार असल्याचा देवसरकरांचा दावा आहे. उमेदवारी मिळाली नाही तरीही उमरखेड, पुसद आणि महागाव या तीन तालुक्यातून ‘राष्ट्रवादी काँग्रेसला हद्दपार’ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातून ज्याप्रमाणे बबनराव पाचपुते, सूर्यकांता पाटील, दीपक केसरकर आदी नेत्यांनी राकाँला रामराम केला, त्याची लागण जिल्ह्य़ात होऊ नये यासाठी गठ्ठा मते असलेल्या अल्पसंख्य समाजाच्या ख्वाजा बेग यांना राष्ट्रवादीने विधान परिषदेचे सदस्यत्व दिले, पण गंमत अशी की, ज्या काँग्रेसच्या माजी खासदार उत्तमराव पाटलांना आमदार संदीप बाजोरिया यांनी प्रयत्न करून अजित पवारांच्या उपस्थितीत एका भव्य समारंभात राष्ट्रवादीत आणले होते त्या दिवं. उत्तमराव पाटलांचे चिरंजीव व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांनी भाजपकडे उमेदवारी मागून राकाँ नेत्यांना चांगलाच धक्का दिला आहे, तर उत्तमराव पाटलांचे बंधु चार्टर्ड अकाउंटन्ट जीवन पाटील यांनी कांॅग्रेसकडे उमेदवारी मागितली आहे.
सेना-भाजप महायुतीतही जागा वाटपाबद्दल कलह सुरू आहे. उमरखेडची जागा भाजपच्या वाटय़ाला आहे. ती सेनेला हवी आहे. उमरखेडमध्ये डॉ. विनायक विनकरे, राजू नजरधने या भाजप नेत्यांमध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरू आहे. यवतमाळात भाजपात माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजू डांगे आणि माजी आमदार मदन येरावार यांच्यात ओढाताण सुरू आहे. या सर्वानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले आहे. महायुतीतील एक घटक पक्ष असलेल्या रामदास आठवलेंच्या आरपीआयने जिल्ह्य़ातील सात पकी एक तरी जागा मिळावी, असा आग्रह धरला आहे.
माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी मंत्री मनोहर नाईकांना जाहीर आव्हान दिल्यानंतर नाईकांनीसुध्दा देवसरकरांचे आव्हान स्वीकारून यंदाची लढाई ‘इसपार या उसपार’ची राहणार असल्याचे संकेत दिले आहेत. मनोहर नाईकांनी यावेळी आपला मुलगा जि.प. उपाध्यक्ष ययाती याला मदानात उतरवण्याचे ठरवले आहे. १९५२ च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून तर आजतागायत पुसदमध्ये वसंतराव नाईक, सुधाकर नाईक आणि मनोहर नाईक हेच आमदार राहिले आहेत. ज्यांनी ज्यांनी नाईकांचे साम्राज्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला ते सारे एखादा अपवाद वगळल्यास नाईकांच्या दावणीला बांधल्या गेल्याचा इतिहास आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती होते की, नवा इतिहास घडतो, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.  

Story img Loader