देवदासींच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी देवदासींसाठी असलेल्या शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले.
    कोल्हापूर जिल्ह्य़ातील शहर व ग्रामीण भागात देवदासी महिलांची संख्या लक्षणीय प्रमाणात आहे. त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी शासनाला वेळोवेळी निवेदने देण्यात आली आहेत. मात्र अद्याप त्याची पूर्तता झालेली नाही. देवदासींच्या मागण्यांची शासनाने दखल घेऊन कार्यवाही करावी, यासाठी शुक्रवारी मोर्चाचे आयोजन केले होते.
    दसरा चौकातून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व माजी नगरसेवक अशोक भंडारे, माजी नगरसेविका माया भंडारे, शिवाजी शिंगे, नसीम देवर्डे, बाळासाहेब कांबळे, मुनाफ बेफारी, शांता कांबळे आदींनी केले.
दलित देवदासींना घरकुल बांधून द्यावे, देवदासींचे अनुदान ७०० वरून १२०० रुपये करावे, आंतरजातीय विवाहितांना अनुदानात वाढ करावी, कोल्हापूर देवदासी कक्षाची स्थापना करावी, देवदासींच्या न्याय प्रश्नांची दखल घ्यावी आदी मागण्यांच्या घोषणा देत मोर्चा निघाला. या मागण्यांचे फलक देवदासींच्या हातामध्ये होते.
मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर तेथे निदर्शने करण्यात आली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी माने यांची भेट घेऊन चर्चा केली.

Story img Loader