देवदत्त साबळे यांची ओळख एकेकाळी ‘साहीर साबळे यांचा मुलगा’ अशी होती. परंतु मेहनतीने ही ओळख पुसत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण खेली. एक संगीतकार म्हणून त्यांनी आपले एक आगळे स्थान निर्माण केले आहे. ‘ही चाल तुरुतुरु, उडती केस भुरुभुरु’ किंवा ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना’ ही त्यांनी ४२ वर्षांपूर्वी संगीतबद्ध केलेली गाणी आजही रसिकांच्या ओठावर आहेत. त्यांचा संगीतकार म्हणून झालेला आजवरचा प्रवास आता लवकरच पुस्तकरूपात प्रकाशित होत आहे. पण त्यापूर्वी त्यांचे ‘आठवणीतील किस्से’ यू टय़ूबवर प्रदर्शित केले जाणार आहेत.
वयाच्या १९ व्या वर्षी देवदत्त साबळे यांनी वरील दोन गाणी संगीतबद्ध केली होती. गायक जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील ही गाणी आजच्या पिढीतही तेवढीच लोकप्रिय आहेत. किंबहुना मराठी वाद्यवृंद आणि गाण्यांच्या भेंडय़ा या दोन गाण्यांखेरीज पूर्ण होऊच शकत नाही. काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर गाजलेल्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमातही त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. सुषमा देशपांडे यांचे लेखन, दिग्दर्शन व संकल्पना असणाऱ्या ‘बया दार उघड’ या कार्यक्रमाचे संगीतही देवदत्त साबळे यांचे होते.
आजवरच्या संगीत प्रवासातील काही आठवणी मी लिहून काढल्या असून लवकरच त्या पुस्तक स्वरूपात प्रकाशित होणार आहेत. त्या पूर्वी या लेखनातील काही भाग माझ्याच आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आला आहे. याचे ध्वनिमुद्रण नुकतेच पार पडले, असे देवदत्त साबळे यांनी सांगितले. संगीतकार म्हणून आजवरच्या वाटचालीत आलेले अनुभव आणि ‘ही चाल तुरुतुरु’ व ‘मनाच्या धुंदीत लहरीत ये ना’ ही गाणी संगीतबद्ध करतानाच्या आठवणी, वडिलांकडून मिळालेली शिदोरी, नाटक, चित्रपट आणि जाहिरात क्षेत्रातील कामाचा अनुभव मी रसिकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही साबळे म्हणाले. माझा मुलगा शिवदर्शन यांच्या ‘मॅजिक अवर क्रिएशन’तर्फे यापैकी एक भाग ३१ मे रोजी ‘यू टय़ूब’ आणि अन्य सोशल नेटवर्किंग साईटवरून प्रकाशित केला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
देवदत्त साबळे यांचे ‘आठवणीतील किस्से’ यू टय़ूब’ वर
देवदत्त साबळे यांची ओळख एकेकाळी ‘साहीर साबळे यांचा मुलगा’ अशी होती. परंतु मेहनतीने ही ओळख पुसत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण खेली.
आणखी वाचा
First published on: 29-05-2014 at 01:39 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devdutt sables memories stories on youtube