काही महिन्यांपूर्वी खाडीकिनाऱ्यावरील तिवरांच्या जंगलात डेब्रिस नेऊन टाकणाऱ्या डंपरवर पालिकेने कारवाई केली असता डंपरचालकांनी नागरिकांना वेठीस धरून ‘रास्ता रोको’ केला होता. बेकायदा डेब्रिस टाकून वर कारवाईच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची दांडगाई त्यांनी केली होती. त्या पाश्र्वभूमीवर आता तिवरांच्या झुडपांमधील भरणी रोखणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांना विकासकाकडून धमकावण्यात आले आहे. विशेष म्हणजे पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या या भरणीची वन खात्याला गंधवार्ताही नाही.
मुंबईची हद्द कुठे संपते आणि मीरा रोड कुठून सुरू होते हे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहीतच नाही. याचाच फायदा घेऊन गेल्या काही दिवसांमध्ये दहिसरच्या एन. एल. कॉम्प्लेक्सजवळ तिवरांच्या झुडुपांमध्ये २७० ब्रास माती टाकण्यात आली. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी घटनास्थळी जाऊन कागदपत्रांची तपासणी करीत दोन वेळा काम बंद करण्याची सूचना केली होती. मात्र तरीही सायंकाळनंतर काम सुरूच होते. अखेर पोलीस अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पुन्हा एकदा काम बंद करण्याची सूचना केली. मात्र पोलिसांसमक्ष विकासकाने आपल्याला धमकावल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. या प्रकरणी म्हात्रे यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.
मुंबई आणि मीरा-भाईंदर दरम्यानचा हा भाग नेमका कोणाच्या हद्दीत येतो हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पालिका अधिकाऱ्यांनी हा भाग ‘मोकळा’ असल्याचा अहवाल देऊन विकासकाला भरणीसाठी मार्ग मोकळा करून दिल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आहे. वास्तविक या कामासाठी वन खात्याची परवानगी आवश्यक आहे. परंतु या भरणीची वन खात्याला गंधवार्ताही नाही. भूखंड मोकळा असल्याचा अहवाल देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांची त्या भेट घेणार आहेत.

Story img Loader