विकासाचा मुद्दा व्यक्तिकेंद्रीत करणे वा विशिष्ट नेत्यांमुळे विकास झाला किंवा नाही ही भूमिकाच चुकीची असून विकासाचे विश्लेषण हे समाजकेंद्री पद्धतीने व्हायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साम्यवादी नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांनी नुकतेच मुंबईत केले.
डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी लिखित ‘वेगळा विदर्भ की अखंड महाराष्ट्र-एका वादाची सद्यस्थिती’ या पुस्तकाच्या समारंभात अ‍ॅड. पानसरे हे अध्यक्ष म्हणून बोलत होते. ग्रंथाली आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार संघात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात भारिप-बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.
राज्य छोटे की मोठे यावरही विकास छोटा की मोठा हे अवलंबून नसून विषमतावृद्धी ही आज स्थिर का झाली, त्याला जबाबदार असलेले घटक कोणते आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची समाजाची समाजाची तयारी केली जाते का, हे खरे प्रश्न आहेत. विदर्भ वेगळा की अखंड या वादाचे विविध स्तर उलगडताना डॉ. जोशी यांनी मुळात हेच प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असल्याचेही अ‍ॅड. पानसरे यांनी सांगितले.
या वेळी बोलताना अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, विदर्भातले नेतेही पश्चिम महाराष्ट्राची गुलामगिरी करण्यातच धन्यता मानतात. विकासाची तळमळ असणारी प्रमुख पक्षातील विदर्भातील पिढीच निर्णयप्रक्रियेत दूर सारली गेली आहे.  
 या वेळी ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानीवडेकर, दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वृत्तवाहिनीचे माजी वृत्तसंपादक नितीन केळकर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले, लेखक डॉ. श्रीपाद जोशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे कार्यवाह विजयकुमार बांदल तर ग्रंथालीचे सुदेश िहगलासपूरकर यांनी प्रास्ताविक केले.

Story img Loader