वेगळ्या विदर्भ राज्यनिर्मितीशिवाय विकास शक्य नाही. विदर्भाच्या लोकांची संयम बाळगण्याची क्षमता संपुष्टात आल्याने २९ ऑगस्टला राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांमुळे जगभरात गाजलेल्या यवतमाळ जिल्ह्य़ातील विदर्भ-मराठवाडा सीमा भागांत उमरखेड येथे विदर्भाचे प्रवेशद्वार ‘विदर्भ राज्यात स्वागत’ असे फलक लावून राज्यनिर्मितीच्या आंदोलनाचे रणिशग फुंकले. महाराष्ट्राची १९६०मध्ये निर्मिती होऊन सुमारे ५२ वर्षांचा कालखंड संपुष्टात येत असताना विदर्भाला सापत्न वागणूक मिळाली आहे. अनेक वेळा विदर्भातील राजकीय जाणकारांनी मागासलेपणाची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. परंतु, कोणताही फरक पडला नाही. त्यामुळे आंदोलनाचे हे पाऊल उचलण्यात आले आहे.
विदर्भ राज्य होण्यासाठी आपले अध्रेअधिक जीवन खर्ची घालणारे चळवळीचे खंदे समर्थक माजी आमदार वामनराव चटप, नागपूर शेतकरी संघटनेचे नेते अरुण केदार, घनश्याम पुरोहित, स्वतंत्र भारत पक्षाचे महासचिव नागपूर येथील अण्णाजी राजेधर, दीपक निलावार, नांदेड जिल्हा शेतकरी संघटनेचे नेते गुणवंत हंगेकर, वेगळा विदर्भ समिती संयोजक माजी नगराध्यक्ष राजू जयस्वाल, काँग्रेस नेते सभापती नंदकिशोर अग्रवाल, भाजपाचे नितीन भुतडा, श्यामराव पाटील, सपाचे काजी चुन्नूमियाँ, अयुब पठाण, शेतकरी संघटनेचे शिवाजी कदम यांच्या उपस्थितीत विदर्भ प्रवेशद्वार पनगंगा नदी काठालगतच्या राज्य मार्गावरील रस्त्याच्या कडेला ठळक शब्दात ‘विदर्भ राज्यात स्वागत’ या नामफलकाचे थाटात व फटाक्यांच्या आतषबाजीत अनावरण करण्यात आले.
राज्य सरकार कोणत्याही राज्याची निर्मिती होणार नाही, अशी वल्गना करीत असले तरी या सर्व प्रकाराला न जुमानता वेगळ्या विदर्भाचा मागणीसाठी हजारो समर्थकांनी श्रावणमासातील गोकुळ कलादिनाचे औचित्य साधून विदर्भ राज्य झाल्याशिवाय पूर्णविराम नाही, असा इशारा देऊन विदर्भाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर सूची फलक लावण्याचे रणिशग फुंकले आहे. याचे पडसाद महामार्गावरून ये-जा करणाऱ्यांमध्ये उमटेल. फलक अनावरणप्रसंगी राजू रामधने, अॅड. बाळासाहेब नाईक, बाबा जहागीरदार, इनाउतुल्ला, पुष्पा चव्हाण, कविता पोपुलवाड, दुर्गमवार, बादल रुडे, मझहर टेलर, सपाचे निसार पेंटर, काँग्रेसचे रमेश चव्हाण, नागपूर-यवतमाळ-नांदेड येथून बहुसंख्य समर्थक उपस्थित होते.
‘नागपूर पॅक्ट’ची होळी
सप्टेंबर १९५३मध्ये यशवंतराव चव्हाण, मोरारजी देसाई, आर. के. पाटील आदींच्या स्वाक्षरींनी झालेल्या नागपूर कराराला ६० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त विदर्भात ठिकठिकाणी या कराराची होळी करण्याचे आंदोलनही विदर्भवाद्यांनी सुरू केले आहे. वास्तविक, बापूजी अणे, ब्रिजलाल बियाणी यांसारख्या नेत्यांनी २९ डिसेंबर १९५३ला केंद्र सरकारने नेमलेल्या फाजल अली राज्य पुनर्रचना आयोगाला दिलेल्या निवेदनात स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी केली होती आणि आयोगाने नागपूर राजधानीसह विदर्भ राज्याचे समर्थन केले होते. १९५६मध्ये विदर्भाचा समावेश मुंबई द्विभाषिक राज्यात होऊन नागपूरचा राजधानीचा दर्जा संपुष्टात आला. विशेष हे की, स्वतंत्र भारतात राजधानीचा दर्जा गमावलेले नागपूर एकमेव शहर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘एक राज्य एक भाषा’ सूत्र सांगितले होते. मात्र, ‘एक भाषा एक राज्य’ सूत्र अमलात आले. १ मे १९६०ला महाराष्ट्र राज्य निर्माण झाले आणि यशवंतराव चव्हाणांनी विदर्भावर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही देत नागपूर करारानुसार नागपूर ही दुय्यम राजधानी करून नागपूरला उच्च न्यायालयाचे खंडपीठ आणि विधिमंडळाचे किमान ६ आठवडय़ांचे एक अधिवेशन नागपूरला, अशी तरतूद करून विदर्भाच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप वामनराव चटप यांनी केला आहे. आम्हाला नागपूर करार मान्य नाही. या कराराची होळी करून सर्वत्र ‘विदर्भ राज्यात आपले स्वागत असो’ चे फलक विदर्भाच्या सीमेवर लावण्याचे आंदोलन सुरू केले आहे.

Story img Loader