पनवेल तालुक्यातील चार गावांची ग्रुप ग्रामपंचायत असलेली गव्हाण ग्रुप ग्रामपंचायत ही उरण व पनवेल या दोन तालुक्यांना जोडणारी आहे. साधारणत: चार ते पाच किलोमीटरच्या परिसरात या ग्रामपंचायतीचा विस्तार आहे. १२ ते १३ हजार लोकसंख्येच्या ग्रुप ग्रामपंचायतीत गव्हाण, कोपर, शेलघर, शिवाजीनगर व बेलपाडा या गावांचा समावेश आहे.
पनवेल व उरणपासून आठ ते १० किलोमीटर अंतरावर असलेले गाव सिडकोच्या माध्यमातून विकसित होणाऱ्या उलवे नोडचाच एक भाग होत आहे. त्यामुळे नवी मुंबईच्या बेलापूर खाडी लगत उभ्या राहत असलेल्या इमारतींची रांग आता मोहा, तरघर, वहाळ,बाणडोंगरी, शेलघरपासून ते शिवाजीनगर व कोपपर्यंत येऊन पोहचल्या आहेत. नेरुळ ते उरण या रेल्वेमार्गाने हा विभाग जोडला जात आहे. त्यातच एमएमआरडीएच्या प्रस्तावित महत्वाकांक्षी सागरी सेतूमुळेही या भागाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार आहे.
रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे शिवाजीनगर व पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांचे कोपर ही दोन्ही गावे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत मोडतात. त्यामुळे या दोघांनी या गावांमध्ये विकास कामे करण्यावर भर दिला आहे.
परंपरागत ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात आधुनिक सुविधायुक्तकनिष्ठ महाविद्यालय तसेच १५ वर्षांपूर्वी जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे मोरू नारायण म्हात्रे इंग्रजी माध्यमाचे विद्यालय उभारून या भागात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला.
गव्हाण विभागाचा सिडकोच्या माध्यमातून विकास करण्यात येत असून याबाबत ग्रामस्थांकडून नागरी सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा केला जात असल्याचे गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाऊशेठ पाटील यांनी सांगितले.
गव्हाण ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक गावात प्राथमिक शाळा असून गावात पूर्वीपासूनच बँक, प्राथमिक रुग्णालय याची व्यवस्था आहे.  गावात विजेची, पिण्याच्या पाण्याची सोय आहे. सिडकोच्या उलवे नोडमधील इमारत उद्योगांमुळे स्थानिकांना रोजगार मिळू लागले आहेत.
पनवेल-उरण परिसरात खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून शेलघर येथे भव्य असे क्रीडा संकुल उभारले आहे. उलवे नोडमधील विकासामुळे परिसराचा विकास होत असला तरी सिडकोने स्थानिक शेतकरी आणि त्यांच्या वारसांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी स्थानिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा