नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान या शैक्षणिक क्षेत्रामध्ये भर दिल्याने देशाची प्रगती होणार आहे. शिवाजी विद्यापीठाने या क्षेत्रातील प्रगत शिक्षण विद्यार्थ्यांना द्यावे, अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी येथे बोलताना व्यक्त केली. प्राथमिक शिक्षणाच्या ढासळत्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करून त्यांनी शिक्षणातील जाणकारांनी याचा विचार करण्याची गरज व्यक्त केली.
शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांचा सांगता समारंभ आज सायंकाळी झाला. विद्यापीठाच्या लोककला केंद्रात आयोजित केलेल्या कार्यक्रम प्रसंगी श्री.पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माजी कुलगुरू आर.के.कणबरकर होते. या वेळी वनमंत्री डॉ.पतंगराव कदम, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, महापौर जयश्री सोनवणे आदी उपस्थित होते. पवार यांच्या हस्ते सुवर्णमहोत्सवी वर्षांचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कुलगुरू डॉ.एन.जे.पवार यांनी स्वागत वप्रास्ताविक केले.
देशातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा घसरत असल्याबद्दल चिंता व्यक्त करून शरद पवार यांनी याचे सोदाहरण स्पष्ट केले. ग्रामीण भागातील पाचवीत शिकणाऱ्या ४० टक्के विद्यार्थ्यांना दुसरीचे पुस्तक वाचता येत नाही. तर ४८ टक्के विद्यार्थ्यांना इंग्रजीचा साधा गंध नाही. देशातील हा कच्चा पाया पक्का करण्याचे आव्हान शिक्षणप्रेमींसमोर आहे. १०० टक्के साक्षर असलेले केरळ, बिहार व महाराष्ट्र या राज्यांतील विद्यार्थ्यांची वाचन क्षमता खूपच खालावल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. देशातील कृषी क्षेत्राचा आढावा घेताना पवार म्हणाले, गतवर्षी देशात धान्य आयात करावे लागले. या वर्षी मात्र कापसाच्या ४० लाख गाठी, २५ लाख टन गहू निर्यात केला आहे. कमी पाणी असतानाही जादा पीक घेण्याच्या तंत्रामुळे हे शक्य झाले असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
————-
 शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू पवार व मुख्यमंत्री चव्हाण यांचे नाते भलतेच घट्ट आहे. यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना डॉ.अप्पासाहेब पवार, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना एस.एन.पवार व आता पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एन.जे.पवार हे कुलगुरू आहेत. चव्हाणांमुळे पवार नावाच्या व्यक्तींना चांगली संधी मिळते याचाच हा प्रत्यय आहे, असे शरद पवार यांनी सांगतांना हास्याची लकेर उमटतानाच टाळ्यांचा कडकडाट झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा