बहुक्षेत्रीय विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्य़ातील घरकुल, अंगणवाडी बांधकामांची दयनीय अवस्था झाली, तर मुलींच्या वसतिगृह बांधकामाला कमी पडणाऱ्या अतिरिक्त निधी मागणीचा प्रस्तावही बासनात आहे. प्राप्त ३० कोटी ४६ लाख निधीतून २५ कोटी खर्च झाला. मात्र, लाभार्थ्यांची निवड, झालेला खर्च व प्रत्यक्ष कामांचे स्वरूप पाहता या एकूण कामांचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे.
राज्याची लोकसंख्या, सामाजिक, आर्थिक स्थिती व मूलभूत सुविधांची उपलब्धता या मानकांच्या आधारे हिंगोली अल्पसंख्याक बहुल जिल्हा म्हणून घोषित केला आहे. बहुक्षेत्रीय विकास योजनेंतर्गत ३ हजार ७३० घरकुले, ४२ अंगणवाडय़ा, मुलींची २ वसतिगृहे, घरकुल, अंगणवाडी बांधकामास ३० कोटी ४६ लाख २४ हजार निधी प्राप्त झाला. या निधीतून २५ कोटी २ लाख ८८ हजार रुपये खर्च झाले. मात्र, ९२९ घरकुलांचे बांधकाम अपूर्ण, तर १०६ घरकुलांचे काम सुरू झाले नाही. १०७ घरकुलांचे आता कुठे खोदकाम सुरू झाले. १८८ जोता स्तरावर, २१३ चे खिडकी लेव्हल, ३१५ चे छतापर्यंत ही घरकुल बांधकामाची अवस्था आहे. अंगणवाडी बांधकामाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.
घरकुल लाभार्थी निवडताना निकष पाळले नाही. अनेक लाभार्थी राहतात एक ठिकाणी, तर त्यांना घरकुलाचा लाभ मिळतो दुसऱ्या ठिकाणी. अनेकांची बांधकामे अपूर्ण असताना अनेक लाभार्थीना घरकुल बांधकामाचे अंतिम देयकाचे धनादेश वितरित केल्यानंतर अनेक गैरप्रकार उघडकीस आले. सेनगाव पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांनी पुसेगाव ग्रामपंचायतअंतर्गत ग्रामसेवकाला सुमारे ३३ घरकुलांचे बांधकामाविषयी पत्र दिले. त्यातील घरकुलांचे बांधकाम ग्रामपंचायतच्या मालकी हक्क नमुना ८ प्रमाणे झाले नाही. घरकुल बांधकामात शौचालयास प्राधान्य असताना ठिकठिकाणी घरकुलांत शौचालय कागदोपत्रीच आहे. पुसेगाव येथील ग्रामसेवक आर. एल. आडे व अभियंता बोधीकर यांना गटविकास अधिकाऱ्यांनी २९ नोव्हेंबर २०१२ रोजी दिलेल्या लेखी पत्रात घरकुल बांधकाम अनियमितता यावरील चौकशीअंती जागेची पाहणी, प्रमाणपत्राचे वाटप न करताच माहिती दिली. प्राप्त माहितीवरून चुकीच्या लाभार्थ्यांना निधी वितरित करण्यात आला. त्यामुळे सरकारची फसवणूक झाल्याचे दोषारोप ठेवून निलंबनाची कारवाई का करू नये, असे पत्र देऊन ३ दिवसांत खुलासा द्यावा. नसता पुढील कारवाईबाबत कार्यालयास कळविण्यात येईल, अशी तंबी दिली. मात्र, ३ महिने लोटूनही या बाबत कोणतीच कारवाई झाली नाही. अंगणवाडी बांधकामाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. अजून ७ अंगणवाडीचे बांधकाम अपूर्ण तर आहेच, पण ३ गावांमधील अंगणवाडी बांधकाम जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. २०१० ते २०१२-१३ या आर्थिक वर्षांत या बांधकामांना मंजुरी मिळाली. घरकुल व अंगणवाडीचे बांधकाम पूर्ण करण्याची मुदत चालू महिनाअखेर असल्याने अपूर्ण कामाची पूर्णत्वाकडील वाटचाल एकूण चित्र पाहता खडतर दिसत आहे. अल्पसंख्य मुलींचे वसतिगृह हिंगोली व वसमतमध्ये मंजूर झाले. प्रत्येकी १ कोटी ५९ लाख ५५ हजार रुपये बांधकाम खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली. एकूण ३ कोटी १९ लाख १० हजार निधी मंजूर झाला. गेल्या डिसेंबरअखेर दोन वसतिगृह बांधकामावर २ कोटी १० लाख ८ हजार निधी खर्च झाला. परंतु झालेले व उर्वरित काम मंजूर निधीतून पूर्ण होत नसल्याने वाढीव अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली. अतिरिक्त मागणीप्रमाणे ३ कोटी ६६ लाख ७२ हजार निधीची गरज आहे. याचप्रमाणे २९ ऑक्टोबर २०१२ रोजी हिंगोली व कळमनुरी येथे प्रत्येकी एक अल्पसंख्य मुलांचे वसतिगृह बांधकामास १३ कोटी ६ लाख निधीचा प्रस्ताव शासनदरबारी पाठविण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा