लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा म्हणजे एखाद्या कॉपीरायटरकडून लिहून घेतलेले भाषण आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यामध्ये काही आश्वासक नाही आणि इतिहास ध्यानात घेता काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर भरवसा ठेवता येत नाही, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुळात काँग्रेस पक्ष जाहीरनाम्याबद्दल गंभीर नाही. निवडणुकीपुरता शेतकऱ्यांना मोफत विजेची आश्वासने द्यायची आणि नंतर ती प्रिटिंग मिस्टेक असल्याचे सांगायचे हा त्यांच्या पक्षाचा इतिहास आहे. निवडणुकीसाठी अशी अश्वासने जाहीरनाम्यात द्यायची असतात अशी व्यक्तव्ये त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेला हा जाहीरनामा या पक्षाच्या इतिहासाची आठवण करून देणारा आहे.
काँग्रेस पक्षाने भ्रष्टाचार निर्मूलनाचे आश्वासन दिले आहे पण प्रत्यक्षात आदर्श घोटाळ्यामुळे मुख्यमंत्री पद सोडावे लागलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी देऊन त्यांचे पुनर्वसन केले.
काँग्रेस पक्ष भ्रष्टाचार निर्मूलनासाठी किती गंभीर आहे हे यावरून दिसून येते. भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कायदे करण्याचे आश्वासन आता काँग्रेस पक्ष देत आहे पण गेल्या दहा वर्ष सत्तेवर असताना पक्षाला याची आठवण झाली नाही का, असा सवाल यावेळी फडणवीस यांनी उपस्थित केला.
परदेशी रोजगार मिळवू पाहणाऱ्या तरुणांसाठी सरकारी एम्प्लायमेंट सुरू करू, असे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे. मात्र, असे आश्वासन देऊन काँग्रेस आघाडी सरकारने अपयशाची कबुली दिली आहे. अटलबिहारी बाजपेयी यांच्या कार्यकाळात २००० ते २००५ या पाच वर्षांत देशात सहा कोटी सात लाख रोजगार निर्माण झाले व २००४-०५ व २००९ -१० या काळात काँग्रेस आघाडी सरकारच्या पाच वषार्ंच्या काळात केवळ सत्तावीस लाख रोजगार निर्माण झाले आहे.
काँग्रेस आघाडी सरकार अर्थव्यवस्था मजबूत राखण्यात अपयशी ठरल्यामुळे तरुणांवर बेकारीचे संकट ओढवले आहे. सत्तेवर आल्यास शंभर दिवसात भारतीयांचा परदेशातील काळा पैसा परत आणू, असे आश्वासन काँग्रेसने सत्तेवर आल्यावर दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यात काँग्रेस पक्ष अपयशी ठरला आहे. आता काँग्रेसने भ्रष्टाचार व काळ्या पैशाच्या विषयावर बोलणे निर्थक आहे, अशीही टीका फडणवीस यांनी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा