आदिवासी समाजासाठीच्या राज्य सरकारी योजनांमध्ये इतका भ्रष्टाचार झाला की योजना राबविण्यापेक्षा त्यांना थेट पैसे दिले असते तरी त्यांचे भले झाले असते, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
गडचिरोली जिल्ह्य़ातील अहेरी येथे रविवारी भाजप व नागविदर्भ आंदोलन समितीने आयोजित केलेल्या विजय संकल्प मेळाव्यात फडणवीस बोलत होते. यावेळी राजे अंबरिशराव, खासदार हंसराज अहीर, खासदार अशोक नेते व भाजपा जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे उपस्थित होते.
आदिवासी समाजासाठी राज्य सरकारने राबविलेल्या गेल्या १५ वर्षांतील योजनांचा आपण हिशेब केला त्यावेळी आढळून आले की आदिवासींसाठी हजारो कोटी रुपयांच्या योजना असल्या तरी भ्रष्टाचारामुळे त्या  त्यांच्यापर्यंत पोहोचू दिल्या जात नाहीत. आदिवासी विभागात सहा हजार कोटी रुपयांचा खरेदी घोटाळा झाला. याबद्दल उच्च न्यायालयात प्रकरण दाखल झाले. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा आदेश दिला. विधानसभा निवडणुकीनंतर आमचे सरकार सत्तेवर आल्यावर आदिवासींच्या पैशावर दरोडा घालणाऱ्यांना तुरुंगात टाकू व त्यांच्या तिजोऱ्यातील पैसा सरकारच्या तिजोरीत आणू, असे फडणवीस म्हणाले.
गडचिरोली जिल्ह्य़ाचा कायापालट करू असे म्हणत गृह मंत्री आर.आर. पाटील यांनी जिल्ह्य़ाचे पालकमंत्रीपद मागून घेतले. प्रत्यक्षात त्यांनी काहीही केले नाही. अशा नेत्यांच्या भरवशावर गडचिरोलीचा विकास होणार नाही, अशी टीका त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीत राजे अंबरिशराव यांनी भाजपला केलेल्या मदतीचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा