महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना राष्ट्रवादीचे मंत्री व आमदार लग्नसमारंभांनिमित्त कोटय़वधी रुपयांची उधळण करत आहेत. आपण याबात रात्रभर तळमळत होतात असे सांगून आपली नाराजी व्यक्त केली. मात्र राष्ट्रवादीकडे असलेल्या आदिवासी विभागात अन्नधान्य खरेदीत होणारी कोटय़वधी रुपयांची लुटमार ही चंबळ खोऱ्यातील डाकूंनाही लाजविणारी असून याची गंभीर दखल आपण कधी घेणार असा खणखणीत सवाल भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांना विचारला आहे.
आदिवासी विभागाकडून गेली काही वर्षे आश्रमशाळांसाठी वीस कोटी रुपयांच्या तांदूळ व गव्हाची सत्तर कोटी रुपयांना खरेदी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे खावटी कर्जरुपाने देण्यात येणाऱ्या तांदूळ व गहू हा सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून उपलब्ध होणाऱ्या दराच्या सत्तर टक्के जास्त दराने खरेदी करण्यात येत असून हा बोजा अत्यंत गरीब असलेल्या आदिवासींनाच सोसावा लागणार आहे. शेकडो कोटींच्या या अन्नधान्य खरेदीतील घोटाळ्याबाबत विधानसभेत वेळोवेळी आवाज उठविण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’तही प्रसिद्ध झाले आहे. आदिवासीमंत्री बबनराव पाचपुते तसेच खात्याचे सचिव व आदिवासी आयुक्त हे या खरेदी घोटाळ्याला जबाबदार असल्याचे माझे स्पष्ट मत असून याबाबतचे आदिवासी विभागाचे खरेदी आदेश, तत्कालीन मुख्य सचिवांनी न्यायालयात सादर केलेल प्रमाणपत्र, सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील दर, बाजारभाव आणि आदिवासी विभागाने खरेदी केलेला दर यांचा तत्काच मी आपल्याला सादर करण्यास तयार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्रातील दुष्काळाची आपण चिंता व्यक्त केली तसेच मंत्र्यांना कामाला लागण्याचे आदेश आपण दिलेत. आपण खरेच गंभीर आहात याची मला कल्पना आहे त्यामुळेच आदिवासी मंत्री बबनराव पचपुते यांच्या विभागातील अन्नधान्य खरेदीची तात्काळ माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करून राजरोसपणे सुरु असलेली जनतेच्या कररुपाने जमा होणाऱ्या पैशाची लुटमार रोखावी असे अवाहानही फडणवीस यांनी या पत्रात केले आहे.

Story img Loader