वैशिष्टय़पूर्ण कार्यक्रमांमुळे अल्पावधीतच देशभरातील प्रतिष्ठीत महोत्सवांच्या पंक्तीत स्थान मिळविलेल्या कल्याण गायन समाजाचा देवगंधर्व संगीत महोत्सव यंदा ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात भरविला जाणार आहे. यंदा महोत्सवादरम्यान संस्थने उभारलेल्या नव्या भव्य वास्तूचे उद्घाटन होणार आहे. ‘लोकसत्ता’ने गणेशोत्सव काळात राबविलेल्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे संस्थेच्या उपक्रमांविषयी सविस्तर माहिती प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर अभिजात संगीताचे एक विद्यापीठ असणाऱ्या या संस्थेची देशभरात ओळख झाली. अनेकांनी संस्थेच्या उपक्रमांसाठी मदतही दिली. महोत्सवाची सुरूवात पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं.अजय चक्रवर्ती यांच्या गायनाने होणार आहे. शुक्रवारी ७ डिसेंबर रात्री नऊ वाजता होणाऱ्या या मैफलीत पं. योगेश समसी (तबला) आणि अजय जोगळेकर (संवादिनी) साथ करणार आहेत.
शनिवार ८ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता बालगंधर्व चित्रपटाशी संबंधित कलावंत ‘असा बालगंधर्व आता न होणे’ या विशेष कार्यक्रमात गाणी, गप्पा आणि किश्श्यांद्वारे या महान गायक-कलावंतांचा जीवनपट उलगडून दाखविणार आहेत. संकल्पना-निर्मिती आदित्य ओक यांची असून निवेदन पूर्वी भावे करणार आहेत. आनंद भाटे, श्रीरंग भावे, मधुरा कुंभार, आदित्य ओक, साई बँकर, कौशल इमानदार आणि सुबोध भावे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
रविवार ९ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कल्याण गायन समाज संचलीत म्हैसकर संगीत अध्यासन प्रस्तुत डॉ. आशा पारसनीस-जोशी यांच्या सृजन या स्वरचीत बंदिशींच्या पुस्तकावर आधारित ‘निरमोही नितमोही’ हा एक अभिनव कार्यक्रम होणार आहे. संकल्पना डॉ. आशा परसनीस-जोशी यांची असून म्हैसकर संगीत विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी त्यात सहभागी होणार आहेत. पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांचे गायन हे या सत्राचे प्रमुख वैशिष्टय़ असणार आहे. संध्याकाळी ६ वाजता उस्ताद दिलशाद खान व उस्ताद साबीर खान यांच्या सारंगी वादनाची जुगलबंदी होईल. त्यांना आदित्य कल्याणपूर तबल्यावर साथ करणार आहेत. उत्तरार्धात ‘संतूर नेस्ट’ या सत्रात पं. राहुल शर्मा यांचे संतूर वादन होईल. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीराम केळकर करणार आहेत. पूर्णोत्सव प्रवेशिका अत्रे रंगमंदिर तसेच कल्याण गायन समाजात उपलब्ध आहेत. संपर्क- प्रशांत दांडेकर-९८२०५७८२९८.

Story img Loader