जन्मतारखेची खोटी कागदपत्रे सादर करून व महाराष्ट्र क्रिकेट संघटनेची फसवणूक करून अझिम काझी या खेळाडूची १९ वर्षांखालील महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड करण्यात आली आहे, या फसवणुकीत जिल्हा संघटनेचे सचिव संजय बोरा यांचाही सहभाग असल्याने दोघांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील देवगावकर क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक मुकुंद देवगावकर यांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेकडे केली आहे. या तक्रारीत जिल्हा सचिवांकडून इतर खेळाडूंवर कसा अन्याय केला जातो याची उदाहरणे त्यांनी दिली आहेत.
जन्मतारखेची खोटी कागदपत्रे सादर करून काझी याच्यासह रोनक खंडेलवाल (१९ वर्षांखालील) व शुभम जरे (१६ वर्षांखालील) या खेळाडूंचीही जिल्हा संघाच्या निवड चाचणीसाठी निवड करण्यात आली, असेही या तक्रारीत देवगावकर यांनी नमूद केले आहे. या तक्रारीनंतरही अझिम याची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली.
महाराष्ट्र संघटनेकडे केलेल्या तक्रारीत म्हटले की, १९ वर्षांखालील संघाच्या निवड चाचणीसाठी १ सप्टेंबर १९९३ अशी जन्मतारीख बंधनकारक होती, त्यापुढील वयाच्या मुलांनी निवड चाचणीसाठी येऊ नये, असेही सचिव बोरा यांनी जाहीर केले होते. त्यामुळे गौरव गुगळे (जन्मतारीख १९ सप्टेंबर १९९३, केवळ २४ दिवस मोठा) यासारखी काही प्रामाणिक मुले निघून गेली. परंतु रोनक खंडेलवाल (जन्मतारीख २२ एप्रिल १९९१) व अझिम काझी (१४ ऑक्टोबर १९९१) या दोघांची ते दोन ते अडीच वर्षांनी मोठे असूनही झालेली निवड संशायस्पद आहे.
सोळा वर्षांखालील संघाच्या निवड चाचणीसाठी १ सप्टेंबर १९९६ अशी जन्मतारीख बंधनकारक होती, परंतु शुभम जरे याची जन्मतारीख १५ मे १९९५ अशी आहे, तरीही त्याची संघात निवड कशी करण्यात आली, असा प्रश्न देवगावकर यांनी उपस्थित केला आहे.
 जिल्हा संघाच्या निवड चाचणीवेळी पियुष बडवे याची जन्मतारीख ३१ जुलै १९९७ असूनही बोन टेस्टच्या नावाखाली त्याचा बळी दिला गेला व १ वर्षे ४ महिन्यांनी मोठा असूनही जरेची निवड झाली, या अन्यायाकडे लक्ष वेधले आहे. या गैरकृत्यात संघटनेचे सचिव बोराही सहभागी असल्याने संघटनेची फसवणूक करणाऱ्या खेळाडूंसह बोरा यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.    
तक्रारीत तथ्य नाही- बोरा
या तक्रारीसंदर्भात जिल्हा सचिव बोरा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, प्रत्येक निवड चाचणीवेळी तक्रार करण्याची देवगावकर यांची पद्धत आहे. ही तक्रार दोन महिन्यांपूर्वीची आहे, त्यामुळे यंदा निवडीसाठी ७ जणांची समिती स्थापन करण्यात आली होती. त्यात माझा समावेश नव्हता. निवडीच्या वेळी जे दाखले, प्रमाणपत्र खेळाडू सादर करतात त्यावर शाळेच्या मुख्याध्यापकांची सही, शिक्के आहेत की नाही हे पाहून ही कागदपत्रे एमसीएला सादर केली जातात. एमसीएला काही संशय आल्यास ते बोन टेस्ट करतात. यामध्ये जिल्हा संघटनेचा काही सहभाग नसतो. संघटनेला खेळ व खेळाडूंचे करिअर यावर लक्ष केंद्रीत करायचे आहे. देवगावकर यांच्या तक्रारीत तथ्य नाही.

Story img Loader