प्रसिद्ध नृत्यांगना व नृत्यदिग्दर्शक मीरा धानू यांची शिष्या देविका पाटील हिचा ‘अरंगेत्रम्’ रंगप्रवेश कार्यक्रम रविवारी सायंकाळी पाच वाजता येथील महाकवी कालिदास कलामंदिरात होणार आहे.
अरंगेत्रम् म्हणजे भरतनाटय़म्मध्ये प्रावीण्य मिळविल्याची पावती होय. गुरूकडे सात ते आठ वर्षे नृत्यप्रकार शिकल्यावर कलाकाराने त्या नृत्यप्रकाराचे जाहीररीत्या सादरीकरण करणे आणि पुढील नृत्यप्रवासासाठी गुरूंचे आशीर्वाद घेणे, असे अरंगेत्रम्चे स्वरूप. देविकाने वयाच्या नवव्या वर्षी मीरा धानू यांच्या ‘नृत्यशारदा’च्या माध्यमातून भरतनाटय़म् शिकण्यास सुरुवात केली. सिल्व्हर ओक शाळेत शिक्षण पूर्ण केल्यानंतर सध्या ती लोणी येथील प्रवरा वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. मुंबई येथील रचना संसद कॉलेज ऑफ परफॉर्मिग आर्ट्स अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरमध्ये झालेल्या कार्यक्रमात अलीकडेच तिने सहभाग घेतला. देविकाला याशिवाय क्रीडा क्षेत्राचीही आवड असून तिने तीन वेळा मुंबई मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. मुंबई ते नाशिक सायकल प्रवासही केला आहे. अरंगेत्रम्मध्ये देविका ही विनायक स्तुती, पुष्पांजली, गणेशपंचरत्न, जातीस्वरम्, पद्म-मामवथु श्रीसरस्वती, श्रीरामाचे चरण धरावे, काली ठोकी, गोवर्धन गिरीधारी, तिलाना, जननी चामुंडा माता श्लोक, यावरील विविध नृत्याविष्कार सादर करणार आहे. तिला संगीतसाथ एस्. कृष्णमूर्ती, शंकर नारायणन्, मंगला वैद्यनाथ, शक्ती, हेमा बालसुब्रह्मण्यम् हे करणार आहेत. या कार्यक्रमास रसिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राजाराम पाटील यांनी केले आहे.     

Story img Loader