पश्चिम बंगालमधील बांकुरा जिल्ह्य़ातील विष्णुपुरा येथील प्रसिद्ध टेराकोटा माती आणि विटांपासून बनविलेली मंदिराची प्रतिकृती हे यंदा शिवाजी पार्कवर बंगाली समाजातर्फे साजऱ्या केल्या जाणाऱ्या दुर्गा उत्सवातील सजावटीचे वैशिष्टय़ आहे.
बंगाली समाजातर्फे ‘बेंगाल क्लब’मार्फत गेली ७८ वर्षे ललिता पंचमीपासून शिवाजी पार्कवर दुर्गा पूजा केली जाते. मुंबईतील ही सर्वात जुनी दुर्गा पूजा असल्याने सप्तमी ते नवमी असे तिन्ही दिवस दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ या ठिकाणी असते. दररोज सुमारे २० ते २२ हजार भक्त या देवीचे दर्शन घेतात. यंदा या देवी दुर्गेची भव्य मूर्ती आणि तिच्या आजूबाजूला बसलेली लक्ष्मी, सरस्वती, गणपती, कार्तिकेय यांच्या मूर्तीही पक्क्या मातीपासून तयार करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर विष्णुपुरातील प्रसिद्ध टेराकोटा मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरीस किंवा थर्माकोल अशा पर्यावरणघातक वस्तू वापरण्याऐवजी पश्चिम बंगालहून मागविण्यात आलेली टेराकोटाची माती व विटांचा वापर करण्यात आला आहे हे विशेष.
मल्ल राजाच्या काळात म्हणजे १७व्या आणि १८ शतकात ही मंदिरे बांधण्यात आली. स्थापत्य कला, संगीत यामुळे विष्णुपूर हे त्यावेळी कला आणि संस्कृतीचे केंद्र बनले होते. टेराकोटा म्हणजे भाजलेली माती. यापासून तयार केलेल्या मातीच्या ठोकळ्यांवर पुराणातील देवदेवतांच्या प्रतिकृती बनवून विटा तयार केल्या जातात. आणि त्यापासून वास्तू उभारली जाते. शिवाजी पार्कवरही याच विटांपासून मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. त्यामुळे, मूळ टेराकोटा मंदिर पाहिल्याते समाधान भाविकांना मिळेल, अशी अपेक्षा बेंगाल क्लबच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य प्रसून रक्षित यांनी व्यक्त केली.
मंदिराबरोबरच तब्बल ४० फूट उंचीचे प्रवेशद्वारही टेराकोटापासून तयार केले जाणार आहे. या विटा शांतिनिकेतच्या कला भवनातील तरूण कारागिरांनी तयार केल्या आहेत. मधुचंदा मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली ही सर्व सजावट करण्यात येणार आहे. देवीची मूर्तीही टेराकोटा पद्धतीची असणार आहे. मूर्ती आणि मंदिराची प्रतिकृती तयार करण्यासाठी तब्बल तीन लाख टेराकोटाच्या विटा पश्चिम बंगालहून मागविण्यात आल्याची माहिती रक्षित यांनी दिली.
दुर्गापुजेच्या काळात शिवाजी पार्कचा हा परिसर मिनी बंगाल बनून जातो. कारण, बंगालच्या विविध वैशिष्टय़पूर्ण संस्कृतीचा आनंद भाविकांना येथे घेता येतो. कारण, या ठिकाणी उत्सव काळात उत्तर भारतातील कलाकरांनी तयार केलेल्या विविध कलावस्तूंचे प्रदर्शन व खरेदीची सोय करण्यात आली आहे. या शिवाय मोगलाई पराठा, मिष्टी दही, माशाचे विविध प्रकार या शिवाय खास बंगाली खाद्यपदार्थाची चव चाखता येते. दुर्गापूजेच्या काळात म्हणून शंख फुंकण्याची स्पर्धाही या ठिकाणी आयोजिली जाणार आहे. तसेच, धाक-धानुची-दांडिया या अनोख्या नृत्य प्रकाराचा आनंद भाविकांना घेता येतो. या शिवाय चित्रकला, क्ले मॉडेलिंग, धाक-धानुची नृत्य स्पर्धाही या निमित्ताने आयोजिण्यात आल्या आहेत.
पर्यावरण स्नेही उत्सव
या देवीची मूर्ती दरवर्षीच मातीची असते. पण, या वर्षी देवीच्या मूर्तीपासून मंडप आणि सजावटीपर्यंतची प्रत्येक गोष्टीत पर्यावरणघातक वस्तू टाळण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर पूजेचा प्रसादही प्लॅस्टिकच्या पिशव्यांऐवजी पर्यावरणप्रेमी पिशव्यांमधून देण्यात येणार असल्याची माहिती रक्षित यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा