भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदारसंघातील मूल किंवा बल्लारपूर तालुक्यात होणारे विमानतळ पालकमंत्री संजय देवतळे यांनी स्वत:च्या भद्रावती विधानसभा मतदारसंघात पळविले असून रविवारी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीने चोरा-चंदनखेडा येथे जागेची पाहणी केली. दरम्यान, येत्या आठवडाभरात ही समिती यासंदर्भातील अहवाल सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
औद्योगिक जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपुरात विमानतळ नाही. मोरवा येथे छोटे विमानतळ आहे, परंतु ताडाळी औद्योगिक वसाहतीतील धारीवाल वीज प्रकल्पाची चिमणी, तसेच चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राच्या चिमण्या व विस्तारित प्रकल्पामुळे मोरवा विमानतळाचे विस्तारीकरण शक्य नसल्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने  स्पष्ट केले. त्यानंतर  प्रस्तावित नवीन विमानतळासाठी दोन वर्षांपासून जागेचा शोध सुरू आहे. भाजपचे बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदारसंघाच्या बल्लारपूर तालुक्यातील कोठारी व मूल तालुक्यातील सुशीदाबगांव येथे विमानतळासाठी जागा निश्चित केली, परंतु कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी चंद्रपूर शहरालगत वन विभागाच्या मोकळ्या जागेवर विमानतळ करावे, अशी मागणी लावून धरली. तेव्हापासून विमानतळाचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र, सुशीदाबगाव येथील जागा विमानतळ विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी निश्चित केल्याची चर्चा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात होती, परंतु जिल्ह्य़ाचे पालकमंत्री संजय देवतळे यांनी स्वत:च्या विधानसभा मतदार संघातील चोरा-चंदनखेडा व ढोरवासा येथे विमानतळ व्हावे, यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. रविवारी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपमहाव्यवस्थापक तानाजी सत्रे व मनोहर हिकरे यांनी  भद्रावती तालुक्यातील चोरा-चंदनखेडा येथे जागेची पाहणी केली.  या जिल्ह्य़ातील बहुतांश उद्योग हे चंद्रपूर-नागपूर मार्गावरील तालुक्यांमध्येच आहेत. त्यामुळे नागपूर मार्गावरच विमानतळ व्हावे, या विचारातूनच चोरा-चंदनखेडा ही जागा सूचविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ही जागा विमानतळ प्राधिकरणाचे उपमहाव्यवस्थापक सत्रे यांनाही पसंत पडली आहे. तसेच पालकमंत्री देवतळे यांना भद्रावती तालुक्यातच विमानतळ हवे आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांचाही या जागेसाठी विशेष आग्रह आहे.
दुसरीकडे सत्रे व हिकरे यांनी मूल तालुक्यातील सुशीदाबगाव येथील प्रस्तावित जागेचीही पाहणी केली. या दोन्ही जागांच्या पाहणीनंतर उपमहाव्यवस्थापक सत्रे यांनी जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची काल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांचीही मते आणि या जिल्ह्य़ातील उद्योग व औद्योगिकीकरणाचीही माहिती घेतली. या जिल्ह्य़ात प्रामुख्याने बल्लारपूर पेपर मिल, अंबूजा, माणिकगड, अल्ट्राटेक, मुरली अ‍ॅग्रो सिमेंट उद्योग आहेत, तसेच दारूगोळा कारखाना, महाऔष्णिक वीज प्रकल्प, पोलाद कारखाने, वेकोलिच्या कोळसा खाणी व नवीन वीज प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्व उद्योगांमध्ये मुंबई, दिल्ली व अन्य ठिकाणातून कार्पोरेट कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जाणे-येणे सातत्याने सुरू असते. ही सर्व वरिष्ठ मंडळी चंद्रपूरला कशी येतात, याचीही माहिती सत्रे यांनी जाणून घेतली. दरम्यान, येत्या आठवडाभरात सत्रे विमानतळाच्या जागेसंबंधीचा अंतिम अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतरच विमानतळासाठी जागा निश्चित होणार आहे. सध्यातरी सुशीदाबगावऐवजी पालकमंत्री संजय देवतळे यांनी सूचविलेल्या चोरा-चंदनखेडा येथील जागेला विमानतळ प्राधिकरणाऱ्या अधिकाऱ्यांनी पसंती दिल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानसभा मतदारसंघातातील विमानतळ आता पालकमंत्री स्वत:च्या विधानसभा मतदारसंघात लॅन्ड करणार आहेत. पालकमंत्री देवतळे त्या दृष्टीने कामाला लागले आहेत. यानिमित्ताने तरी का होईना विमानतळाच्या जागेचा तिढा लवकरच मार्गी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.