आगामी लोकसभा निवडणुकीत पालकमंत्री संजय देवतळे यांना उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या वर्तुळात होत असताना उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी येथे आलेल्या पक्ष निरीक्षकांना काल गुरुवारी रात्री देवतळेंविरोधात जोरदार नारेबाजीचा सामना करावा लागला.
काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील निरीक्षकांनी संपूर्ण विदर्भाचा दौरा केला होता. यात संभाव्य उमेदवार कोण असतील, याची चाचपणी प्रत्येक जिल्ह्य़ातील नेत्यांना भेटून केली होती. आता प्रदेश काँग्रेसने सुद्धा याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्य़ात निरीक्षकांना पाठवणे सुरू केले आहे. त्यानुसार काल राज्याचे रोहयो मंत्री नितीन राऊत व मारोतराव कुंभलकर या जिल्ह्य़ाच्या दौऱ्यावर आले होते. काँग्रेसमध्ये येथे दोन गट सक्रीय आहेत. त्यांना स्वतंत्रपणे भेटण्याचा निर्णय या निरीक्षकांनी घेतला होता. पुगलिया गटाने येथील राजीव गांधी सभागृहात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोलावून ठेवले होते, तर पालकमंत्री संजय देवतळे यांच्या गटातील नेते शासकीय विश्रामगृहावर जमले होते. नितीन राऊत राजीव गांधी सभागृहात जाताच तेथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी संजय देवतळेंविरोधात पालकमंत्री हटाव, जिल्हा बचाव, अशी नारेबाजी केली. देवतळे निष्क्रीय असल्याने त्यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून काढा, अशी मागणी ते करीत होते. माजी खासदार नरेश पुगलिया यांनाच उमेदवारी देण्यात यावी, अशीही त्यांची मागणी होती. अखेर राऊत यांनी त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्याचा वा काढण्याचा अधिकार मला नाही, असे भाषणातून स्पष्ट केले. या मतदारसंघात पक्षाला सलग दोनदा पराभव पत्करावा लागल्याने यावेळी नवीन उमेदवार देण्याचा विचार सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर देवतळे यांचे नाव समोर आले आहे. नेत्यांनी तसे संकेत देणे सुरू केले आहेत.