सुमधुर गीते अन् डोलायला लावणारी नृत्ये यामध्ये खासबाग मैदानाचा आखाडा रंगला असताना भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी लोकसभेच्या निवडणुकीची उमेदवारी जाहीर करून नवा रंग भरला. निमित्त होते भीमा फेस्टिव्हलच्या कार्यक्रमाचे. संगीतकार अवधुत गुप्ते यांच्या ‘कोणता झेंडा घेऊ हाती व मोरया’ या गीताने खचाखच भरलेले स्टेडियम मंत्रमुग्ध झाले. या वेळी यशपाल देवकुळे या गायकास स्वरताजचा मुकुट प्रदान करण्यात आले.    
बी चॅनेलच्या वतीने प्रतिवर्षी भीमा फेस्टिव्हल या सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन केले जाते. या अंतर्गत चार महिन्यांपासून स्वरताज हा रिअॅलिटी शो रंगला होता. सवरेत्कृष्ट १० गायकांना गायनाची संधी भीमा फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी रंगली. त्यामध्ये यशपाल देवकुळेने यश मिळविले.     बहारदार गीते, नीलेश साबळे-हेमांगी कवी यांचा विनोदी तडका, प्रेक्षकांची मने जिंकणारी नृत्ये यामुळे फेस्टिव्हलमध्ये रंग भरत गेला.     
प्रास्ताविकात भीमा फेस्टिव्हलचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी आपण २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार आहोत, त्याला तुम्ही साथ द्यावी असे भावनिक आवाहन केले. याचबरोबर कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हे निश्चित नसले तरी प्रचाराला सुरुवात करावी असे उपस्थिताना सांगितले. या वेळी आमदार महादेवराव महाडिक, अरुण नरके, विश्वास पाटील, रामराजे कुपेकर, सुहास लटोरे, अरुंधती महाडिक आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा