भाजपचे खा. गोपीनाथ मुंडे यांचे बोट धरून राजकारणात आलेले पुतणे धनंजय मुंडे यांनी भाजप आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेतला. काकांनी चाळीस वर्षांत निर्माण केलेल्या राजकीय साम्राज्याविरुध्द दंड ठोकला आहे. पण आगामी काळात धनंजय यांच्या नेतृत्वाचा कस लागणार असून स्वतंत्रपणे आपलं नेतृत्व सिध्द करण्यासाठी राष्ट्रवादीतील नेत्यांच्या गर्दीत बारामतीकर किती ताकद देतात यावरच राजकारणात सुरू केलेल्या दुसऱ्या टप्प्याचे भवितव्य ठरणार आहे, तर सत्तेचे राजकारण करण्यासाठी समाजाच्या राजकीय विचारांच्या कक्षाही रुदांवल्या पाहिजेत, हे मात्र नक्की.
   बीडचे खा. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे माजी आमदार धनंजय मुंडे १५ वर्षांंपूर्वी काकांचे बोट धरून राजकारणात आले. पण दीड वर्षांपूर्वी बंड करून राष्ट्रवादीच्या कळपात सामील झाले. तेव्हापासून मुंडे कुंटुबातील संघर्ष उघड झाला. भाजप बंडखोर ही बिरुदावली घेऊन वावरणाऱ्या धनंजय यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन संपूर्णपणे राष्ट्रवादीची पताका खांद्यावर घेतली आहे. आगामी काळात काका विरुध्द लोकसभा अथवा विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे सांगून दंड थोपटले आहेत. बंडा नंतरच्या पहिल्याच जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवाचा झटका बसल्यानंतर भानावर आलेल्या धनंजय यांनी गाव पातळीवरून संघटना बांधणीला सुरुवात केली. चाळीस वर्षांत खा. गोपीनाथ मुंडे यांनी परळी मतदारसंघावर पकड मजबूत करताना राज्याचे नेतृत्व केल्याने त्यांचा जनमानसावर प्रभाव कायम आहे. त्यामुळे मुंडेंच्या वर्चस्वाला आव्हान देणे सोपे नाही. मात्र
त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या धनंजय यांनी नाथ्रा ग्रामपंचायत जिंकू न डाव यशस्वी केला. मतदारसंघातील जवळपास पंच्याहत्तर ग्रामपंचयतींवर वर्चस्व असल्याचा दावा त्यांनी छापील अवाहालातून केला आहे, तर सिरसाळा गणाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणून पहिल्या राजकीय चाचणी परीक्षेत काठावर पास होण्यात यश मिळविले आहे.
    शरद पवार व अजित पवार यानी खा. मुंडेंचे अनेक सहकारी फोडून त्यांच्या राजकीय साम्राज्याला हादरे देण्याचा प्रयत्न केला. पण त्यात थोडेही यश आले नाही. मात्र धनंजय यांनी पोटनिवडणुकीतून राष्ट्रवादीच्या यशाचे दार उघडले, तर पवारांचा डोळा मुंडेंना मिळणाऱ्या एकगठ्ठा मतावर आहे. केज विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला मिळणाऱ्या एकगठ्ठा मताच्या गावात धनंजय यानी राष्ट्रवादीला मतांचे खाते उघडले. तर सिरसाळा गणात वर्षांनुवर्ष भाजपला मतदान मिळणाऱ्या गावात राष्ट्रवादीला मतांची आघाडी घेतल्याने अजित पवाराच्या दरबारात धनंजयचे राजकीय वजन वाढल्याचा दावा त्यांचे कार्यकर्ते करतात.
    खा. गोपीनाथ मुंडे यांनी ऊसतोडणी मजूर, व्यवस्थेने पिचलेल्या समाजात आत्मविश्वास निर्माण करून राजसत्तेचे स्वप्न दाखविले. सत्ता आपण चालवू शकतो, हा विश्वास दिला. पण युतीच्या काळातील साडेचार वर्षांचा अपवाद वगळता मुंडे सत्तेपासून दूरच आहेत. मात्र साहेब मुख्यमंत्री होणार या अपेक्षेवर आजही जनमत खंबीरपणे मुंडेंच्याच मागे आहे. काळ झपाटय़ाने बदलत आहे. तरुण पिढीला लवकर प्रगती पाहिजे. कोण कोणासाठी थांबण्यास तयार नाही. त्यामुळे सत्तेच्या बाजूने गेलेले धनंजय यांच्या मागे तरुणांचा कल वाढला आहे. देशात अनेक ठिकाणी एकाच कुटुंबातील व्यक्ती वेगवेगळ्या पक्षात असतात. सरकार कोणत्याही पक्षाचे आले तरी सत्तेचा वाटा मिळतोच. पश्चिम महाराष्ट्रातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. त्यामुळेच त्या भागाच्या विकासाला चालना मिळाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा